जीवन प्रबोधिनी ट्रस्टच्या वतीने शिरवली येथे मोफत ब्लँकेट वाटप - वृत्त रिपोर्टर (दादासाहेब येंधे) Vrutta Reporter

ब्रेकिंग

शुक्रवार, ८ मार्च, २०२४

जीवन प्रबोधिनी ट्रस्टच्या वतीने शिरवली येथे मोफत ब्लँकेट वाटप

दोन पिढी जोडणारा दुवा म्हणजे आजी आजोबा : निकेत पावसकर


तळेरे, दि. ८ :  दोन पिढी जोडणारा महत्त्वाचा दुवा म्हणजे आपल्या घरातील आजी आजोबा आहेत. त्यामुळे जीवन प्रबोधिनी ट्रस्टने आयोजित केलेला आजचा कार्यक्रम केवळ ब्लँकेट वाटपापुरता मर्यादित नसून त्यामागे या मातीशी, या परिसराशी आणि या खऱ्याखुऱ्या माणूसपण जपणाऱ्या माणसांशी जुळलेल्या भावना आहेत, म्हणून हा कार्यक्रम वेगळा असल्याचे प्रतिपादन प्रमुख पाहुणे संदेश पत्र संग्राहक निकेत पावसकर यांनी व्यक्त केले. 

शिरवली ग्रामपंचायत सभागृहात जीवन प्रबोधिनी ट्रस्टच्या वतीने आयोजित ज्येष्ठ नागरिकांना मोफत ब्लँकेट वाटप कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन शिरवली सरपंच सुचिता मोहिते यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आणि दीपप्रज्वलनाने करण्यात आले. यावेळी महात्मा गांधी तंटामुक्त समिती अध्यक्ष सुनील पोयरेकर, ग्रामपंचायत सदस्य मनोज सावंत, रचना कदम, प्रज्ञा पोयरेकर, दिनेश पोयरेकर, निर्मला कदम आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी जीवन प्रबोधिनी ट्रस्टच्या वतीने शिरवली गावातील 50 आजी आजोबांना मोफत ब्लँकेट तसेच आयुर्वेदिक तेल वाटप करण्यात आले. तर उर्वरित 30 आजी आजोबांना घरी जाऊन ब्लँकेट वाटप करण्यात येईल. 

यावेळी बोलताना पावसकर म्हणाले की, आपले परंपरागत संस्कार घडविणारी, लोकगीते पुढील पिढीकडे संक्रमित करणारी आणि सर्वात महत्वाचे म्हणजे एकत्र कुटुंब पध्दत आजही टिकवून ठेवणारी ही महत्त्वाची पिढी आहे. सुदैवाने ग्रामीण भागात हे आजही टिकून आहे मात्र, शहरी भागात हे दिसत नाही. त्यामुळे अस्वस्थता वाढते. आजची सामाजिक परिस्थिती बिघडण्यामागे हेही एक कारण आहे. चक्क आजी आजोबा अनेक कुटुंबातून बाहेर टाकले गेलेत. त्यामुळे योग्य वयात योग्य संस्कार मिळाले नाहीत की अक्षरश: एक पिढी बरबाद होते. 

यासाठी आज जीवन प्रबोधिनी ट्रस्टने या आजी आजोबांना ब्लँकेट वाटप करून त्यांनी माया, ममता, प्रेम आणि आपुलकी आम्हा सर्वांवर सदैव असावी हा यामागे हेतू आहे. यावेळी सरपंच सुचिता मोहिते, सुनील पोयरेकर, वैभव शिंदे आणि ज्येष्ठ नागरिकांमधून शिरीष शिरवलकर यांनी मनोगत व्यक्त करताना जीवन प्रबोधिनी ट्रस्टचे संस्थापक सत्यवान नर यांचे विशेष आभार मानले.

हा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडण्यासाठी जीवन प्रबोधिनी ट्रस्टच्या वतीने मनोज सावंत, अमोल काडगे, संदीप पोयरेकर, अमित पोयरेकर, संकेत काडगे, कल्पेश कदम, भिकाजी जठार, प्रशांत पोयरेकर, सतीश काडगे, समीर पोयरेकर, सागर मोहिते यांनी विशेष परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक, सूत्रसंचालन संकेत काडगे यांनी तर आभार प्रज्ञा पोयरेकर यांनी मानले. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज