सायबर गुन्हेगारांच्या पोलीस आवळणार नाड्या - वृत्त रिपोर्टर (दादासाहेब येंधे) Vrutta Reporter

गुरुवार, ८ फेब्रुवारी, २०२४

demo-image

सायबर गुन्हेगारांच्या पोलीस आवळणार नाड्या

मुंबई पोलिसांचा 'सायबर शिल्ड' उपक्रम

८/२/२०२४

मुंबई, दादासाहेब येंधे : मुंबईत पोलिसांनी गेल्या काही वर्षांतील गुन्हेगारीचा आकडा कमी केल्यानंतर आता गुन्ह्यांची जागा सायबर गुन्ह्यांनी घेतली असून हे गुन्हे रोखण्यासाठी सायबर विभागाला मजबूत केले जात आहे. मुंबईतील १३विभागांत अद्ययावत लॅब सुरू होत असतानाच मुंबई पोलिस दलातील २०० पोलिसांना 'सायबर कमांडो' म्हणून प्रशिक्षण देण्यात आले आहे.

1%20cyber%20shield

देशभरात सर्वाधिक सायबर गुन्हे मुंबईत घडतात. काही वर्षांपूर्वी मुंबईत एकच सायबर पोलिस ठाणे होते. मात्र, सायबर गुन्ह्यांचे प्रमाण वाढत गेल्याने पाच अतिरिक्त पोलिस आयुक्त कार्यालयांच्या कक्षेत पाच सायबर पोलिस ठाणी सुरू करण्यात आली. ही सायबर पोलिस ठाणीदेखील कमी पडू लागल्याने प्रत्येक पोलिस ठाण्यात अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देऊन सायबर विभाग सुरू करण्यात आले. नागरिकांनी सायबर हेल्पलाईन क्रमांक १९३० या क्रमांकावर सायबर गुन्ह्याची तक्रार करण्याची विनंती यावेळी करण्यात आली.

2%20cyber%20shield

किरकोळ सायबर गुन्ह्यांसह गंभीर, मोठ्या रकमांच्या गुन्ह्यांचा तपास करताना येथील अधिकाऱ्यांना पुरेशी तांत्रिक मदत वेळेवर मिळत नसल्याचे समोर आले. त्यामुळे मुंबई पोलिसांनी स्टेट बँकेच्या मदतीने 'सायबर शील्ड' हा प्रकल्प हाती घेतला. या प्रकल्पांच्या पहिल्या टप्प्यात मुंबईतील १३ पोलिस उपायुक्त कार्यालयांच्या कक्षेत १३ ठिकाणी सायबर लॅब सुरू करण्यात येत आहेत.  सद्यस्थितीत २०० पोलिसांना प्रशिक्षण देण्यात आले असून त्यांना “सायबर कमांडो" म्हणून संबोधले जाणार आहे.  


सायबर गुन्हे रोखण्यासाठी हाती घेण्यात आलेल्या 'सायबर शिल्ड मोहिमेच्या बोधचिन्हाचे अनावरण पोलिस आयुक्त विवेक फणसळकर यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. यावेळी विशेष पोलिस आयुक्त देवेन भारती, पोलिस सहआयुक्त सत्यनारायण चौधरी उपायुक्त विशाल ठाकूर, स्टेट बँकेचे मुख्य महाव्यवस्थापक जी. एस. राणा हे उपस्थित होते. 

3%20cyber%20shield

सायबर गुन्हे घडल्यानंतर पोलिस तपास करतातच, पण ते घडू नयेत यासाठी प्रयत्न व्हायला हवेत, असे मत पोलिस आयुक्त विवेक फणसळकर यांनी यावेळी व्यक्त केले. सायबर गुन्हे रोखण्यासाठी वेगवेगळ्या माध्यमातून जनजागृती करण्यावर भर दिला जाणार असल्याचे आयुक्त म्हणाले, १९३० या सायबर हेल्पलाइन क्रमांकाबाबतही अनेकांना अद्याप माहिती नाही. सायबर गुन्ह्यासंदर्भात अशीही एक हेल्पलाइन आहे हे नागरिकांपर्यंत पोहोचवणे गरजेचे आहे. 

2407%20cyber%20commando


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Bottom Ad

पेज

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *