शस्त्रांसह पोलिसांनी ठोकल्या बेड्या
मुंबई, दि. २८ : ठाण्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यावर गोळीबाराच्या गुन्ह्यासह हत्या, हत्येचा प्रयत्न, दरोडा, जबरी चोरी, बेकायदेशीर अग्निशास्त्र बाळगणे अशा विविध गंभीर गुन्ह्यांची नोंद असलेल्या कुख्यात अंडरवर्ल्ड छोटा राजन टोळीच्या ४२ वर्षीय गुंडाला नुकत्याच बेड्या ठोकल्या आहेत. श्याम पांडुरंग तांबे उर्फ सॅव्हीओ रॉड्रिक्स असे आरोपीचे नाव असून त्याच्याकडून पिस्तूल जप्त करण्यात आले आहे.
ठाण्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यावर गोळीबार प्रकरणात कारवाई करण्यात आल्यानंतर डिसेंबर २०१९ मध्ये तो कारागृहाबाहेर पडला. सोमवारी सायंकाळी तो येथील कृष्ण हॉटेल जवळ बंदूक घेऊन येणार असल्याची कक्ष-३ च्या पथकाला माहिती मिळाली. प्रभारी पोलिस निरीक्षक दीपक सुर्वे यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक शामराव पाटील यांच्यासह पथकाने सापळा रचून तांबे उर्फ सॅव्हीओ रॉड्रिक्स याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे देशी बनावटीचे पिस्तूल आणि तीन जिवंत काडतुसे सापडली आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा