सात जणांना पोलिसांनी केली अटक
मुंबई, दि. २६ : अनधिकृत कॉल सेंटर मधून कॅनडाच्या नागरिकांना ॲमेझॉन द्वारे आयफोन, लॅपटॉपची ऑर्डर आल्याचा कॉल केला जायचा संबंधितांनी ऑर्डर केली नसल्याचे सांगताच ऑर्डर रद्द करण्यासाठी नागरिकांचे बँक डिटेल्स घेऊन खात्यावर बेकायदेशीर व्यवहार झाल्याची भीती दर्शवून कोट्यावधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. या कारवाईत सात जणांना नुकतीच अटक करण्यात आली आहे.
गोरेगाव पूर्व येथील रॉयल पाम परिसरात अनधिकृत कॉल सेंटर सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या कक्ष-११ ला मिळाली. त्यानुसार पथकाने छापा टाकला. यावेळी सहा जण व मॅनेजर हे बनावट कॉल सेंटर चालवत असल्याचे निष्पन्न झाले. ही मंडळी व्हीओआयपी कॉलद्वारे खोट्या नावाने कॅनडा येथील नागरिकांना फोन करून त्यांना ॲमेझॉन कंपनीच्या ऑर्डरमध्ये महागडे फोन व लॅपटॉप आल्या बाबत सांगत असत.
या टोळीने अशाप्रकारे कोट्यावधी रुपयांना नागरिकांना फसवल्याचा संशय गुन्हे शाखेला आहे. या कारवाईत लॅपटॉप, मोबाईल, हेडफोन, राउटर असा सव्वा तीन लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. या कारवाईत सात आरोपींना अटक करत गुन्हे शाखा अधिक तपास करत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा