यंदा अॅनिमल किंग्डम संकल्पना; हत्ती, वाघ आणि झेब्रा आदींच्या पुष्पप्रतिकृती साकारणार
प्रदर्शनात मांडणार दहा हजार कुंड्या; फळझाडे, फुलझाडे-भाजीपाल्यांचाही समावेश
मुंबई, दि. ३० : मुंबईत आले आणि वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणिसंग्रहालयाला भेट दिली नाही, असा पर्यटक, अभ्यासक विरळाच. येथे येणाऱया पर्यटकांसाठी सर्वाधिक आकर्षण ठरते ते वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यानात दरवर्षी भरवले जाणारे उद्यानविद्या प्रदर्शन. यंदाचे प्रदर्शन शुक्रवार, दिनांक २ फेब्रुवारी ते रविवार दिनांक ४ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत होणार आहे.
.jpeg)
बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. इकबाल सिंह चहल, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) श्रीमती आश्विनी भिडे, उप आयुक्त (उद्याने) श्री. किशोर गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली उद्यान विभागाकडून विविध उपक्रम राबविण्यात येतात.
बृहन्मुंबई महानगरपालिका व वृक्ष प्राधिकरणाद्वारे दरवर्षी आयोजित होणारे वार्षिक उद्यानविद्या प्रदर्शनाचे हे २७ वे वर्ष आहे. भायखळा (पूर्व) स्थित वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानात आयोजित या भव्य प्रदर्शनाचे म्हणजेच ‘फ्लॉवर शो’चे (Flower-show) शुक्रवारी, दिनांक २ फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी ११ वाजता उद्घाटन होणार आहे. शुक्रवारी दुपारी ११ ते रात्री ८ पर्यंत; तर दिनांक ३ व ४ फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी ८ ते रात्री ८ या दरम्यान सर्व नागरिकांसाठी विनामूल्य खुले असणार आहे, असे उद्यान अधीक्षक श्री. जितेंद्र परदेशी यांनी सांगितले.

दरवर्षीच्या वार्षिक उद्यानविद्या प्रदर्शनामध्ये पाना-फुलांचा वापर करून वैविध्यपूर्ण रचना सादर करण्यात येतात. या रचनांना देखील मुंबईकर नागरिकांचा आणि विशेष करून लहान मुलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असतो. सन २०१५ पासून या प्रदर्शनाला विविध सृजनशिल कल्पनांची जोड देण्यात आली आहे. त्यानुसार दरवर्षी एक वेगळा विषय घेवून हे प्रदर्शन मांडण्यात येते. यंदाच्या प्रदर्शनाचा विषय ‘अॅनिमल किंग्डम’हा आहे. यात बागेच्या प्रवेशद्वाराजवळच झाडे, पाना-फुलांपासून हत्ती, वाघ आणि झेंब्रा आदी प्राण्यांच्या पुष्प प्रतिकृती साकारल्या जाणार आहेत. याशिवाय प्रदर्शनात दहा हजार कुंड्या मांडण्यात येणार आहेत. त्यामध्ये विविध प्रकारची फुलझाडे, फळझाडे आणि भाजीपाल्याचा समावेश असेल. समवेत, खास आकर्षण म्हणून परदेशातील काही निवडक भाजीपालादेखील या प्रदर्शनात मांडण्यात येणार आहे.

वास्तुविशारद विद्यार्थी घेणार धडे-
यंदाच्या प्रदर्शनाचे खास वैशिष्ट्य म्हणजे उद्यान विभागामार्फत मुंबईतील विविध वास्तुविशारद महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व प्रात्यक्षिकाचा अनुभव घेता यावा, यासाठी दिनांक ३१ जानेवारी आणि दिनांक १ फेब्रुवारी २०२४ या दोन दिवसांत विशेष सत्रांचे आयोजन केले आहे. यामध्ये आय. ई. एस. महाविद्यालय, एल. एस. रहेजा महाविद्यालय, स्वामी विवेकानंद महाविद्यालय, ज. जी. स्कूल ऑफ आर्टस् व रचना संसद महाविद्यालयामधील विद्यार्थ्यांना निमंत्रित करण्यात आले आहे. जवळपास १५०-२०० विद्यार्थी या प्रशिक्षण शिबिराचा लाभ घेणार असल्याचे श्री. जितेंद्र परदेशी यांनी सांगितले. या विद्यार्थ्यांना एखादे प्रदर्शन कसे मांडतात, त्यातील लॅण्डस्केपिंगचे डिझाईन कसे केले जाते, याचे प्रात्यक्षिक पहायला आणि अभ्यासाला मिळणार आहे.
(जसंवि/६१३)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा