Ticker

6/recent/ticker-posts

विदेशात नोकरीचे आमिष दाखवून बनावट ऑफर लेटर

मुंबई, दि. १० : मुंबईसह आसपासच्या परिसरात प्लेसमेंट एजन्सी कार्यालय थाटून विदेशात नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांना बनावट व्हिसा, ऑफरलेटर देत फसवणूक करणाऱ्या टेलर मित्रांचा गुन्हे शाखा-८ च्या पथकाने पर्दाफाश केला आहे. यामध्ये मुंबईत १०० हून अधिक जणांचे कोट्यावधी रुपयांची फसवणूक केली आहे. शाहिद हुसेन मोहम्मद शेख, मोहम्मद नाजीम मोहम्मद मनीहार अशी आरोपींची नावे आहेत.


मरीन लाईन्स, खार, सांताक्रुझ, गोरेगाव यासह मिरा रोड येथे सिल्वर ट्रॅव्हल्स, रॉयल ट्रॅव्हल्स अशा वेगवेगळ्या नावांनी प्लेसमेंट एजन्सीची कार्यालये थाटून काहीजण विदेशात नोकरी करण्यासाठी इच्छुक असलेल्या तरुणांना कुवेत, दुबई, सिंगापूर येथे नोकरी देण्याचे आमिष दाखवून फसवणूक केल्याची माहिती गुन्हे शाखा मिळाली होती. गुन्हे शाखाचे उपयुक्त राज तिलक रौशन, सहाय्यक पोलीस आयुक्त महेश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली कक्ष-८ चे प्रमुख पोलीस निरीक्षक लक्ष्मीकांत साळुंखे यांच्या नेतृत्वातील पथकाने तपास सुरू केला  गुन्हे शाखेने मरीन लाईन्स मधील स्टॅंडर्ड हाऊसच्या पहिल्या मजल्यावर आरोपींनी थाटलेल्या रॉयल ट्रॅव्हलच्या कार्यालयावर छापेमारी केली या कारवाईत जोगेश्वरी येथील शाहिद आणि मालाडच्या नाझीमवर कारवाई केली. गुन्ह्यातील दोघांना १२ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.


ही टोळी विदेशातील नामांकित कंपन्यांचे बनावट जॉब ऑफर लेटर आणि संबंधित देशांचा बनावट वर्कव्हिसा या तरुणांना व्हाट्सअप ॲपद्वारे पाठवत विश्वास संपादन करत होती. पुढे या उमेदवारांच्या वैद्यकीय चाचण्या करून प्रत्येकी ८० हजार रुपये स्वीकार करत होती. एकाच वेळी २५ ते ३० जणांकडून पैसे स्वीकारल्यानंतर तरुणांनी नोकरीसाठी तगादा लावताच ही मंडळी कार्यालय बंद करत आणि तेथून पळून जाऊन तरुणांची फसवणूक करत असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या