मुंबई, दि. ३१ : टास्कच्या नावाखाली नागरिकांचे खाते रिकामे करणाऱ्या दोघांना माटुंगा पोलिसांनी गुजरात मधून नुकतीस अटक केली आहे. आरोपींच्या बँक खात्यांचे व्यवहार तपासले असता दोन ते तीन महिन्यात ६० कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा संशय आहे. आरोपींशी संबंधित एक कोटी रुपयांची रोख रक्कम देखील पोलिसांनी गोठविली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार माटुंगा पूर्व येथील वस्तीगृहात असताना तक्रारदार क्रिश वर्मा याला २८ ऑक्टोबरला एक मेसेज आला होता. मेसेज मध्ये ऑनलाईन नोकरीची आवश्यकता असल्यास कॉल करण्यास सांगण्यात आले होते. क्रिस ने होकार देताच त्याला एका टेलिग्राम ग्रुप मध्ये सहभागी करण्यात आले. त्यानंतर ऑनलाईन टास्क पूर्ण केल्यास चांगल्या परतावा मिळण्याचे आमिष तुला दाखवण्यात आले. चार टेलिग्राम आयडी द्वारे संपर्क साधून आरोपीनी त्याला विविध कामे करण्यास सांगितले. त्या बदल्यात दोन लाख ४५ हजार रुपये तक्रारदाराला जमा करण्यासदेखील भाग पाडण्यात आले. यामध्ये फसवणूक झाल्याचे लक्षात त्या तरुणाने पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा नोंदवून तपास सुरू केला.
माटुंगा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दिगंबर पगार व त्यांच्या सायबर पथकाने तांत्रिक पुरावांच्या मदतीने तपास करत रुपेश ठक्कर व पंकज भाई ओढ या दोघांना गुजरात मधील गांधीनगर येथून कलोल तालुक्यातून अटक केली त्यांच्याकडे अधिक तपास सुरू आहे.
आरोपींकडून ३३ डेबिट कार्ड व क्रेडिट कार्ड, ३२ विविध बँक खात्यांचे चेकबुक, सहा मोबाईल , २८ सिम कार्ड, चार कंपन्यांच्या नावाचे बनावट स्टॅम्प हस्तगत करण्यात आले आहेत. आरोपींनी क्रिश वर्मा यांच्याकडून घेतलेली रक्कम २० बँक खात्यांमध्ये हस्तांतरित केली होती. त्या बँक खात्यांची तपासणी केली असता गेल्या दोन ते तीन महिन्यात ६० कोटींहून अधिक रकमेचा व्यवहार झाल्याचे धक्कादायक माहिती समोर आली आहे.
0 टिप्पण्या