मुंबई, दादासाहेब येंधे : मुंबईतील विक्रोळी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ऐरोली टोलनाका परिसरात मुंबई पोलिसांनी तसेच अन्न व औषध प्रशासनाने संयुक्तरीत्या केलेल्या कारवाईत जवळजवळ २ कोटी १ लाख ३० हजार ६२० रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा, सुगंधित पानमसाला आणि गुटखा वाहून नेण्यासाठी वापरण्यात आलेली १४ वाहने जप्त केली आहेत.या प्रकरणी १० जणांना ताब्यात घेण्यात आले असून, एकूण १४ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
८ जानेवारी २०२६ रोजी पहाटेच्या सुमारास मुलुंड पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली होती की, जुना जकात नाका, ऐरोली टोलनाका परिसरात काही वाहनांमधून प्रतिबंधित गुटख्याचा मोठा साठा मुंबईत वितरीत करण्यासाठी येणार आहे. या माहितीच्या आधारे अन्न सुरक्षा अधिकारी राजेंद्र विनायक कर्डक आणि पोलीस पथकाने या ठिकाणी सापळा रचून टेम्पोंना घेराव घातला असता, तेथे उपस्थित असलेल्या इसमांची पळापळ सुरू झाली. काही आरोपींनी झाडीझुडपांचा फायदा घेऊन पळ काढला, तर १० जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. वाहनांची झडती घेतली असता त्यात ‘राज निवास’, ‘वरानसी आशिक’, ‘व्हीसी ५ टोबॅको’, ‘एसएके’ यांसारख्या विविध कंपन्यांचा प्रतिबंधित गुटखा आणि सुगंधित पानमसाला मोठ्या प्रमाणात आढळून आला.आदिल अबुबकर शेख, सिराज सिद्धकी, निजामुद्दीन जुम्मन, इष्तियाक साह, सुनील जाधव, मारुती सोरनार, गोपाळ सहाणी, गजानन गुंडकर, संदीप साबळे आणि प्रदीप मुतगुंडे असे ताब्यात घेण्यात आलेल्या गुटखा तस्करांची नावे आहेत. त्यांच्याकडून पोलिसांनी टाटा इन्ट्रा, मारुती सुपर कॅरी, बोलेरो पिकअप, टाटा १२१२, आय-२० कारसह एकूण १४ वाहने जप्त केली आहेत.

0 टिप्पण्या