मुंबई, दि. १४ : देशातील प्रमुख गांजा वितरक आणि महाराष्ट्रातील गांजा विक्रीतील मोहरक्या म्हणून ओळख असलेल्या लक्ष्मीकांत रामा प्रधान उर्फ लक्ष्मीभाई अखेर गुन्हे शाखेच्या जाळ्यात अडकला आहे. लक्ष्मीभाई यास त्याच्या साथीधारासह ओडिशातून बेड्या ठोकल्या आहेत. महिनाभरात त्याने दोन टन गांजाची विक्री करत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या तपासात समोर आली आहे.
गुन्हे शाखेच्या अमली पदार्थविरोधी विभागाचे पोलीस उपयुक्त प्रकाश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली घाटकोपर कक्षाच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक लता सुतार यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली आहे. 12 डिसेंबर २०२१ रोजी घाटकोपर कक्षाने विक्रोळीतून साडेतीन कोटींचा १,८२० किलो गांजा जप्त केला होता. या कारवाईत तस्कर आकाश सुभाष यादव, दिनेश कुमार सजीवन सरोज याला अटक झाली. टोळीचा सदस्य संदीप भाऊ सातपुते हा मुंबई, ठाणे, विरार, पालघर येथे गांजाची विक्री करत होता. त्यालाही २३ जून २०१९ रोजी अटक केली होती. तिन्ही आरोपीविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले असून ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. टोळीचा म्होरक्या लक्ष्मीकांत रामा प्रधान व त्याचा साथीदार विद्याधर वृंदावन प्रधान हे फेब्रुवारी २०१९ पासून ओडिशा, तेलंगाना, हैदराबाद, नेपाळ येथे ओळख लपवून राहत होते. प्रधान हा ओडिशा येथे असल्याचे समजताच सुतार यांच्या नेतृत्वात पथकाने सापळा रचला. दोन वेळा पथकाचे प्रयत्न फसले होते. अखेर पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या.
प्रधान हा स्थानिक टेम्पो चालकांना हाताशी धरून नारळ कांदा तसेच विविध वस्तूंच्या आडून गांजाची तस्करी करत होता.
0 टिप्पण्या