Ticker

6/recent/ticker-posts

भीक मागण्यासाठी पदपथावरील मुलीची चोरी

दोन महिलांना सोलापूर मधून अटक


मुंबई, दि. ५ : दक्षिण मुंबईमधून मुल चोरीची दोन प्रकरणे उघडकीस आल्यानंतर मुंबई पोलिसांनी पश्चिम उपनगरातून आणखी एका अपहरणाचा डाव उधळून लावला आहे. भीक मागण्यासाठी एक वर्षाच्या मुलीची चोरी करणाऱ्या दोन महिलांना मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने सोलापूर येथून अटक केली. दोघींच्या तावडीतून मुलीची सुखरूप सुटका करण्यात आली. त्याचप्रमाणे या मुलीची कुणाला विक्री करण्यात येणार होती याचाही शोध पोलीस घेत आहेत. सांताक्रूझच्या जुहू तारा रोडवरील फुटपाथवर राहणाऱ्या मुस्कान शेख यांची एक वर्षाची मुलगी ३० ऑक्टोबरला रात्री अचानक गायब झाली. आजूबाजूला शोध घेतल्यानंतर मुलगी आढळून आली नाही.  मुस्कान हिने सांताक्रुज पोलीस ठाणे गाठून मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार दिली. मुलगी लहान असल्याने पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला. 


दक्षिण मुंबईत फुथपाथवरून मुल चोरी झाल्याची घटना ताजी असतानाच हा प्रकार घडल्याने गुन्हे शाखेने समांतर तपास सुरू केला. पोलीस उपायुक्त संग्रामसिंग निशाणदार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेची तपास पथके तयार करण्यात आली. प्रभारी पोलीस निरीक्षक संजय खताळे, सिद्धाराम म्हेत्रे, स्नेहल पाटील, शार्दुल बनसोडे यांच्या पथकाने सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून तपास सुरू करताना दोन महिलांनी मुलीला पळवून नेल्याचे स्पष्ट झाले. सीसीटीव्ही फुटेजमध्ये या महिलांचे चेहरे दिसल्यानंतर त्यांचे फोटो परिसरातील खबऱ्यांपर्यंत पोहोचविण्यात आले. शरिफा शेख (वय,५०) आणि सुजाता पासवान (वय, ४२) अशी या दोन महिलांची नावे असून त्या जुहू येथील नेहरू नगर झोपडपट्टीत राहत असल्याची माहिती प्राप्त झाली. या महिलांच्या कुटुंबीयांकडून मिळालेली माहिती, सीसीटीव्ही फुटेज यावरून या दोघीजणी रेल्वेने मुंबई बाहेर गेल्याचे समोर आले. दोघीजणी मुलीला घेऊन सोलापूर येथे स्थानकावर असल्याचे समजताच पोलिसांनी आरपीएफच्या मदतीने त्यांना ताब्यात घेतले आणि मुलीची सुखरूप सुटका केली. सुटका करण्यात आलेल्या मुलीला पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी पोलीस आयुक्त कार्यालयात तिच्या आईकडे सुपूर्द केले. 


शरीफा आणि सुजाता या दोघीजणी आरोपी मुलीला विकण्यासाठी हैदराबाद येथे गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. या ठिकाणी मूल विक्रीचा सौदा फिस्कटल्याने त्या हैदराबाद येथून परतीच्या प्रवासाला निघाल्या. सोलापूर येथेही त्यांचा मूल विक्रीचा प्रयत्न होता. मात्र, त्याआधीच पोलिसांनी दोघींना पकडले आणि विक्री होण्याआधीच मुलीची त्यांच्या तावडीतून सुटका केली. 












टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या