चर्चगेट रेल्वे स्थानक परिसर तसेच डॉ. शामाप्रसाद मुखर्जी चौक परिसरातील रस्ते व पदपथ आणि माधवदास लक्ष्मणदास कोठारी प्याऊ जीर्णोद्धार कामांचे मंत्री श्री. आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत भूमिपूजन - वृत्त रिपोर्टर (दादासाहेब येंधे) Vrutta Reporter

बुधवार, ४ मे, २०२२

demo-image

चर्चगेट रेल्वे स्थानक परिसर तसेच डॉ. शामाप्रसाद मुखर्जी चौक परिसरातील रस्ते व पदपथ आणि माधवदास लक्ष्मणदास कोठारी प्याऊ जीर्णोद्धार कामांचे मंत्री श्री. आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत भूमिपूजन

दक्षिण मुंबईतील चर्चगेट रेल्वे स्थानक परिसर आणि डॉ. शामाप्रसाद मुखर्जी चौक परिसराच्या सौंदर्यीकरणासाठी रस्ते व पदपथ विकास आणि मेट्रो चित्रपटगृहालगत स्थित माधवदास लक्ष्मणदास कोठारी प्याऊचा जीर्णोद्धार या कामांचे भूमिपूजन राज्याचे पर्यावरण, पर्यटन व राजशिष्टाचार मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्हा पालकमंत्री श्री. आदित्य ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज (दिनांक २ मे २०२२) सायंकाळी करण्यात आले.

02.%20PR1_6723%20(1)

अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) श्री. पी. वेलरासू, उपआयुक्त (पायाभूत सुविधा) श्री. उल्हास महाले, ए विभागाचे सहायक आयुक्त (प्रभारी) श्री. शिवदास गुरव, माजी नगरसेवक श्री. गणेश सानप, माजी नगरसेविका श्रीमती सुजाता सानप यांच्यासह स्थानिक नागरिक व इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते.


चर्चगेट उपनगरीय रेल्वे स्थानक आणि डॉ. शामाप्रसाद मुखर्जी चौक हे दोन्ही परिसर पुरातन वास्तू परिसर आहेत. मागील काळात डॉ. शामाप्रसाद मुखर्जी चौक परिसरातील काही भागांचे सौंदर्यीकरणाचे काम महानगरपालिकेच्या प्रमुख अभियंता (इमारत परिरक्षण) खात्याच्या माध्यमातून करण्यात आले होते.

आता रस्ते विभागाच्या माध्यमातून डॉ. शामाप्रसाद मुखर्जी चौक परिसरातील सुमारे साडेतीन किलोमीटर अंतराचे पदपथ आणि चर्चगेट रेल्वे स्थानक परिसरातील सुमारे दीड किलोमीटर अंतराचे पदपथ विकासासह सौंदर्यीकरण करण्यात येणार आहे. या विकासामध्ये पदपथासह बस थांबे आणि रंगरंगोटीसह इतर बाबींचाही समावेश आहे. ही कामे डिसेंबर २०२२ अखेरपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे.


ए विभागातील मेट्रो चित्रपटगृहालगत महात्मा गांधी मार्गावर माधवदास लक्ष्मणदास कोठारी प्याऊ ही पुरातन वास्तू श्रेणीत मोडणारी प्याऊ आहे. पूर्वी मुंबई शहरात वाटसरुंची तसेच प्राण्यांची तहान भागवण्यासाठी विविध ठिकाणी पाणपोई अर्थात प्याऊंची निर्मिती करण्यात आली होती. या प्याऊंचे संचालन धर्मादाय संस्था अथवा दात्यांकडून केले जात असे. माधवदास लक्ष्मणदास कोठारी प्याऊ ही अशीच पुरातन प्याऊ आहे. मंदिरांच्या शिखराप्रमाणे दोन नक्षीदार कमान असलेल्या या प्याऊचे शास्त्रोक्त पद्धतीने जीर्णोद्धार करण्यात येणार आहे. प्याऊची मूळ नक्षीदार संरचना पूर्ववत करणे, तुटलेले पुरातन भाग त्याच प्रकारच्या दगडांपासून तयार करुन पुनर्स्थापित करणे, ओतीव लोखंडांचे नक्षीदार नळ बसविणे, जलव्यवस्था पूर्ववत करुन टाकीमधून शुद्ध पाणी उपलब्ध होण्याची व्यवस्था करणे अशी निरनिराळी कामे जीर्णोद्धारात समाविष्ट आहेत. जीर्णोद्धाराचे काम येत्या ९ महिन्यात पूर्ण करण्याचे नियोजन असून त्यासोबत ३ वर्षे परिरक्षणाचे कामदेखील सोपविण्यात आले आहे.















जसंवि/०५८

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Bottom Ad

पेज

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *