Ticker

6/recent/ticker-posts

डिलिव्हरी बॉयची चारित्र्य पडताळणी करावी लागणार

मुंबई : ऑनलाइन मागवलेले खाद्यपदार्थ लवकर पोहोचण्यासाठी वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये सध्या चढाओढ लागलेली दिसून येत आहे. लवकरात लवकर डिलिव्हरी करण्यासाठी अनेकदा डिलिव्हरी बॉयकडून वाहतूक नियमांचे उल्लंघन केले जाते. तसेच अनेकदा लुटमारीच्याही घटना घडल्यामुळे डिलिव्हरी बॉय तसेच संबंधित कंपन्यांना शिस्त लावण्यासाठी नवीन पोलीस आयुक्त संजय पांडे मैदानात उतरले आहेत. त्यांनी डिलिव्हरी बॉयच्या नियुक्ती दरम्यान चारित्र्य पडताळणी आवश्यक असल्याच्या सूचना रविवारी दिल्या आहेत. तसेच वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या विरोधात थेट गुन्हे दाखल होणार आहेत. यामध्ये डिलिव्हरी बॉयबरोबर कंपन्यांनाही जबाबदार धरण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.



पांडे म्हणाले की, माझ्याकडे अनेक नागरिकांनी वाहतूक नियमांचे उल्लंघन करत गाडी चालवणाऱ्या डिलिव्हरी बॉयच्या तक्रारी केल्या आहेत. यापुढे डिलिव्हरी बॉयने वाहतुकीचे नियम मोडले तसेच विरुद्ध दिशेने गाडी चालवताना आढळल्यास डिलिव्हरी बॉयसहित काम करत असलेल्या संबंधित कंपनीवर देखील कारवाई करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.


तसेच्या डिलवरी बॉय संबंधित नियमावलीही जारी करण्यात आली आहे. यामध्ये डिलिव्हरी बॉयची नियुक्ती करताना चारित्र्य पडताळणी अहवाल प्राप्त करणे आवश्यक आहे. त्यांना सेवा पुरवणे संदर्भात आवश्यक ते प्रशिक्षण देण्यात यावे तसेच त्यांच्या कामाबाबतचे करारपत्र व आवश्यक ती सर्व कागदपत्रे जमा करून घेणे गरजेचे राहणार आहे. बऱ्याचदा डिलिव्हरी बॉय क्षमतेपेक्षा जास्त वजनाचे आकाराचे सामान घेऊन दुचाकी चालवताना दिसून येतात. याबाबतही कंपनी चालकाने दक्षता घ्यावी अन्यथा संबंधितांवर कारवाई करण्यात यावी. तसेच त्यांना व्यवस्थित गणवेश परिधान करण्यास सांगावे, अशा सूचना देखील आयुक्तांनी दिल्या आहेत.




















CP letter

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या