Ticker

6/recent/ticker-posts

वाहतूक पोलिसाला बॉनेटवर फरफटत नेले

अंधेरीतील धक्कादायक घटना कारचालकाला अटक

मुंबई, दादासाहेब येंधे : विरुद्ध दिशेने जाणाऱ्या कार चालकावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या विजयसिंह गुरव या वाहतूक पोलिसाला आझाद नगर ते डी. एन. नगर दरम्यान बोनेटवर बसून फरफटत नेल्याची धक्कादायक घटना गुरुवारी सकाळी अंधेरी परिसरात घडली. वाहन चालकाविरुद्ध डी. एन. नगर पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतले आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

विजयसिंह गुरव हे जोगेश्वरीतील मेघवाडी  पोलिस वसाहतीत राहत असून ते वाहतूक विभागात पोलीस नाईक म्हणून कार्यरत आहेत. सध्या त्यांची नेमणूक डी. एन. नगर वाहतूक पोलिस चौकीत आहे. गुरुवारी सकाळी ते आझाद नगर येथे कर्तव्य बजावत होते यावेळी काळ्या रंगाची एक हुंडाई कार (एमएच-०१-डिके-१३१४) सर्व नियमांचे उल्लंघन करून विरुद्ध दिशेने येत असल्याचे विजयसिंह यांच्या निदर्शनास आले. त्यांनी या वाहन चालकाला थांबण्याचा इशारा केला, कार थांबल्यानंतर त्यांनी काच खाली करण्यास सांगितले. मात्र, कार चालकाने कारची काच खाली केली नाही, तो पळून जाऊ नये म्हणून ते कारच्या बोनेटवर जाऊन बसले. 

विजयसिंह बोनेटवर बसले असतानाही कार चालकाने कार सुरू केली. आझाद नगर येथून डी.एन. नगर वसाहतीत त्यांना कार चालकाने  फरफटत नेले. रस्त्यावरच्या नागरिकांनी त्याला थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र, कारचालकाने कोणाचेही ऐकले नाही. काही वेळाने ही कार जुहू गल्ली येथे आढळली. तिथूनच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याच्या विरोधात सरकारी कामात अडथळा आणल्यासह अन्य भादवी कलमांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

व्हिडिओ 👇 पहा..






टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या