बनावट प्रमाणपत्र आणि स्टॅम्प हस्तगत
मुंबई दादासाहेब येंधे : गरजू, बेरोजगार तरुणांना रेल्वे प्रशासनामध्ये १०० टक्के नोकरी मिळवून देतो असे आमिष दाखवून गंडा घालणाऱ्या तीन जणांच्या टोळीला सीएसएमटी लोहमार्ग पोलिसांनी मध्य रेल्वे सीएसएमटी येथील मेन लाईन येथून मोठ्या शिताफीने अटक केली. यात स्वप्निल उर्फ जनार्दन कांबळे, समीर गोरे आणि मोहिद अहमद शेख अशी त्यांची नावे आहेत. आत्तापर्यंत या आरोपींच्या विरोधात १९ बेरोजगार गरजू नागरिकांनी तक्रार नोंदवली आहे. त्यांना सोमवारी न्यायालयात हजर करण्यात आले.
नोकरीच्या शोधात असलेल्या बेरोजगार तरुणांना हेरून त्यांना रेल्वेत शंभर टक्के नोकरी मिळवून देतो असे आरोपी समीर गोरे पटवून सांगायचा. तसेच त्याच्या ओळखीतले मुख्य अधिकारी विभागीय रेल्वे व्यवस्थापक मध्य रेल्वे सीएसएमटी येथे बसतात असे सांगून आरोपी स्वप्निल यांची भेट घालून द्यायचे.
बेरोजगार तरुण यांच्या भुलथापांना फसले की, आरोपी पैशांची मागणी करून पैसे द्या मग वैद्यकीय प्रमाणपत्र व नंतर नियुक्तीपत्र देतो असे सांगायचे. तरुणांनी पैसे दिले की, आरोपी मोहम्मद शेख खोटे वैद्यकीय प्रमाणपत्र व नियुक्ती पत्र देण्याचे काम करायचा. अशी माहिती सीएसएमटी लोहमार्ग पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण भगत यांनी दिली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा