मुंबई, दादासाहेब येंधे : यावर्षीदेखील गणेशोत्सवावर कोरोनाचं संकट असून त्याबाबतचा धोका लक्षात घेता गणेश भक्तांना लालबागसह सार्वजनिक गणपतींचे थेट दर्शन घेता येणार नसून फक्त ऑनलाईन दर्शन घेता येणार आहे. त्यामुळे गणेशभक्तांना लालबागचा राजासह सर्व सार्वजनिक मंडळांचे गणपती थेट जाऊन पाहता येणार नाहीत. लालबाग मधील सर्व गणेश मंडळाची मुंबई पोलिस आणि पालिका अधिकाऱ्यांसोबत नुकतीच बैठक पार पडली यावेळी हा निर्णय घेण्यात आला.
मुंबईतील कोरोनाबाबतची स्थिती आटोक्यात आली असली तरी तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्य सरकारकडून खबरदारी घेतली जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर गणेशोत्सवात कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन होऊ नये यासाठी वारंवार प्रशासनाकडून आवाहन केले जात आहे. दरम्यान मुंबईत सार्वजनिक गणेशोत्सव पाहण्यासाठी लालबागमध्ये सर्वात जास्त गर्दी होत असते. लालबागमधील गणेशगल्ली, लालबागचा राजा, रंगारी बदक चाळीचा लाडका लंबोदर, चिंचपोकळीचा चिंतामणी अशी अनेक मोठी मंडळे असून तिथे असणाऱ्या उंच मूर्ती, नेत्रदीपक सजावट पाहण्यासाठी गणेशभक्त नेहमी गर्दी करत असतात. यावेळी मूर्ती चार फुटांच्या असणार आहेत.
गणेशमूर्तींची उंची कमी असली तरी लालबाग मध्ये होणारी गर्दी लक्षात घेता कोणत्याही मंडळाचे दर्शन बाहेरून येणाऱ्या गणेश भक्तांना घेता येणार नाही. मात्र, येथील रहिवासी आणि स्थानिकांना दर्शन घेता येणार आहे. मंडळांकडून गणेश भक्तांसाठी ऑनलाइन दर्शनाची व्यवस्था करण्यात येणार आहे. पोलिस आणि सार्वजनिक गणेश मंडळांमध्ये नुकतीच एक बैठक पार पडली. यावेळी गणेश मंडळ यांना तसे आदेश देण्यात आले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा