मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यात नमुंमपा अधिकारी, कर्मचारी यांचे साहित्य अभिवाचन
महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागामार्फत 14 ते 28 जानेवारी या कालावधीत जाहीर करण्यात आलेल्या मराठी भाषा संवर्धन पंधरवडानिमित्त नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत. या अनुषंगाने नामवंत मराठी लेखकांच्या पुस्तकांमधील आवडत्या साहित्य संपदेचे अभिवाचन करण्याचा अभिनव उपक्रम नवी मुंबई महानगरपालिकेच्या अधिकारी, कर्मचारी यांच्या सहभागाने यशस्वीरित्या संपन्न झाला.
सुप्रसिध्द साहित्यिक, कवी श्री. अरूण म्हात्रे यांच्या साहित्य व समाज या व्याख्यानाने 25 जानेवारी रोजी मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याची सुरुवात झाली असून 27 जानेवारी रोजी महापालिका अधिकारी, कर्मचारी वृंदाने आपल्या आवडत्या पुस्तकातील निवडक मजकुराचे अभिवाचन करून ते पुस्तक संपूर्ण वाचनाची उत्सुकता उपस्थितांच्या मनात निर्माण केली.
यामध्ये अतिरिक्त आयुक्त श्रीम. सुजाता ढोले यांनी रणजीत देसाई लिखीत स्वामी या कादंबरीतील सांगता प्रसंगाचे अभिवाचन केले. समाज विकास विभागाच्या उप आयुक्त श्रीम. क्रांती पाटील (मृत्युंजय - शिवाजी सावंत), श्रीम. चित्रा बाविस्कर (जेव्हा गुराखी राजा होतो - निंबाजीराव पवार), श्री. अभय जाधव (इडली ऑर्कीड आणि मी - विठ्ठल कामत), श्री. तुषार पवार (तुमच्या अंतर्मनाची शक्ती - डॉ. जोसेफ मर्फी ), श्रीम. शर्मिली दिघे (व्यक्ती आणि वल्ली - पु.ल.देशपांडे), श्रीम. प्रिती जाधव (माझी मिरासदारी - द. मा. मिरासदार) यांनी अभिवाचनात सहभाग घेऊन आवडत्या पुस्तकातील उता-यांचे वाचन केले.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याचे औचित्य साधून विविध उपक्रमांचे आयोजन केले जात असून मुख्यालयातील ज्ञानकेंद्रात संपन्न होणा-या प्रत्यक्ष कार्यक्रमाला व फेसबुक लाईव्ह वरून हा कार्यक्रम बघणा-या दर्शकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा