विरोधकांनी फडकावले निषेधाचे फलक
मुंबई : मराठा समाजाच्या आरक्षणावरून सत्ताधारी आणि विरोधकांचे चांगलीच जुंपली. मराठा आंदोलकांना घरात घुसून मारले जात आहे, असा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. या टीकेला सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी प्रत्युत्तर दिले. विधिमंडळ अधिवेशनाच्या प्रारंभी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासह भाजप आमदारांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून विधानभवनाच्या पायऱ्यांवर सरकारच्या निषेधाचे फलक घेऊन ठिय्या दिला. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना फडणवीस यांनी सरकारवर हल्लाबोल केला. ते म्हणाले, या सरकारला मराठा आरक्षणाबाबत आस्था नाही. आंदोलकांवर गुन्हे दाखल केले जात आहे. त्यांना घरात घुसून मारल्याचाही आरोप त्यांनी केला. फडणवीस यांच्या आरोपांना मराठा आरक्षण विषयी मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी उत्तर दिले ते म्हणाले, 'मराठा आरक्षणासारख्या सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या मुद्द्यावर विरोधी पक्षातील अनेक नेते जबाबदार असल्याने वक्तव्य करीत आहेत. या मुद्द्यावर त्यांना फक्त राजकारणच करायचे आहे. त्यांच्या हाताला सध्या काहीच काम नाही. त्यामुळे उचलली जीभ लावली टाळ्याला हाच त्यांचा एककलमी कार्यक्रम असल्याची टीका चव्हाण यांनी केली.'

0 टिप्पण्या