मुंबईतील लालबाग येथे सिलेंडर स्फोट
मुंबई, दादासाहेब येंधे: मुंबईतील लालबाग गणेशगल्ली येथील साराभाई इमारतीत सिलेंडर स्फोट झाला आहे. या स्फोटात १५ जण जखमी झाले असून त्यांना पुढील उपचारासाठी केईएम, मसीना तसेच ग्लोबल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
लालबागमधील साराभाई ही चार माळ्याची चाळ असून तेथील मंगेश राणे यांच्या मुलीचे ९ डिसेंबर रोजी लग्न होते. त्यानिमित्त रविवारी हळद आणि सोमवारी साखरपुड्याचे आयोजन करण्यात आले होते. त्याची तयारी सुरू असतानाच अचानक रविवारी सकाळी ७.१५ वा. सुमारास जोरदार स्फोट झाला. येथील स्थानिकांच्या म्हणण्यानुसार साराभाई चाळीतील दुसऱ्या मजल्यावरील राणे यांच्या बंद घरात हळदीच्या जेवणाची पूर्वतयारी सुरू होती. स्वयंपाकाची तयारी सुरू असतानाच गॅस शेगडी पेटवतात गॅसचा स्फोट झाला. त्यात राणे कुटुंबियांसोबत अन्य जणही मोठया प्रमाणात भाजले. स्फोटाच्या दणक्याने घराची भिंतही कोसळली असून आजूबाजूच्या घरातीलही काही रहिवासी जखमी झाले आहेत. प्रथमदर्शनी गॅस गळतीमुळे हा स्फोट झाला असल्याचे पोलिसांचा अंदाज आहे.
महापौर किशोरीताई पेडणेकर यांनी घटनास्थळी भेट देऊन रुग्णालयामध्ये जाऊन जखमींची विचारपुसही केली. अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळविले असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.


0 टिप्पण्या