Ticker

6/recent/ticker-posts

नवरात्र उत्सवाचे स्वरूप कसे असणार..?

आशिष शेलार यांनी पत्राद्वारे सरकारकडे केली मागणी

मुंबई, दादासाहेब येंधे : गणेशोत्सवाच्या काळात उत्सवाचे नियमावली, चाकरमान्यांच्या प्रवासाची सोय व अन्य मुद्यांवरून राज्य सरकारला धारेवर धरणाऱ्या आशिष शेलार यांनी आता सरकारला नवरात्रोत्सवाची आठवण करून दिली आहे. भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सविस्तर पत्र लिहून ही महत्त्वाची मागणी केली आहे. 
मूर्तिकारांना दिलासा देण्याची मागणी त्यांनी सरकारकडे केली आहे. गणेशोत्सवानंतर नवरात्र उत्सवाची तयारी सुरू झाली असून मूर्तिकार देवीची मूर्ती घडविण्यास सुरुवात करत आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देवीच्या मूर्तीची उंची किती असणार..? नवरात्र उत्सवाचे स्वरूप कसे असणार? गणेशोत्सवाचे नियम या उत्सवालाही लागू असतील की त्यात काही बदल करणार..? याबाबत मूर्तिकारांना वेळीच माहिती मिळण्याची आवश्यकता आहे असं शेलार यांचं म्हणणं आहे. 
मूर्तीच्या उंचीच्या बाबतीत मूर्तिकारांच्या मनात संभ्रम आहे. मूर्तिकार ही एक छोटी इंडस्ट्री असून हजारो कामगार, कारागिरांचा उदरनिर्वाह या उद्योगावर अवलंबून आहे. इतर उद्योगांप्रमाणेच या उद्योगालाही कोरोनाची झळ बसली आहे. त्यांचे आणखी नुकसान होऊ नये म्हणून उत्सवाच्या नियमावली सरकारने वेळीच जाहीर करावी. त्यासाठी सर्व संबंधितांची तातडीची बैठक घ्यावी अशी मागणी आशिष शेलार यांनी पत्राद्वारे केली आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या