Ticker

6/recent/ticker-posts

पोलिओ लसीकरण मोहिमेला नागरिकांचा चांगला प्रतिसाद

 उपराष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेला नवी मुंबईकर नागरिकांचा चांगला प्रतिसाद
 

उपराष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीमेअंतर्गत आज नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात आयुक्त श्री.अभिजीत बांगर यांच्या मार्गदर्शनानुसार पल्स पोलिओ लसीकरण मोहिम प्रभावी रितीने राबविण्यात आली. नवी मुंबई महानगरपालिकेच्या 23 नागरी आरोग्य केंद्रांच्या माध्यमातून खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांचे दवाखाने, सोसायटी कार्यालये, रूग्णालये, रेल्वे स्टेशन, डेपो, नाके अशा विविध ठिकाणी 706 लसीकरण बूथ स्थापन करण्यात आले होते. साधारणत: 89709  इतके 5 वर्षाखालील लाभार्थी नजरेसमोर ठेवून या मोहिमेचे नियोजन करण्यात आले होते.

महत्वाचे म्हणजे कोरोना महामारीच्या कालावधीत ही लसीकरण मोहीम होत असल्याने बूथवर कार्यरत सर्व कर्मचारी, स्वयंसेवक यांना सुरक्षेच्या सर्व बाबींचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यास अनुसरून सर्व बुथसमोर एकमेकांमध्ये सुरक्षित अंतर रहावे यादृष्टीने वर्तुळे आखण्यात आली होती. मास्कचा वापर स्वयंसेवकांसह नागरिकांनाही अनिवार्य करण्यात आला होता. बालकाला लस पाजण्यापूर्वी व पाजल्यानंतर हात सॅनिटाईज करण्यात येत होते. लस देताना बालक पालकाकडेच असेल याची काळजी घेऊन लांबूनच बाळाला स्पर्श न करता तसेच ड्रॉपरचा स्पर्श बाळाच्या तोंडाला होणार नाही याची दक्षता घेऊन लस पाजण्यात येत होती. अगदी लसीकरण झाल्याचे फिंगर मार्कींग करतानाही बाळाला स्वयंसेवकाने स्पर्श न करता बालकाचे बोट पालकांना धरण्यास सांगून फिंगर मार्कींग करण्यात येत होते. अशा प्रकारची काळजी सर्व पोलिओ बुथवर घेण्यात येत होती.
          
तथापि काही कारणांमुळे ज्या संभाव्य लाभार्थी बालकांचे लसीकरण होऊ शकले नाही त्यांना दि. २१ ते 26 सप्टेंबर या कालावधीत घरोघरी जाऊन पल्स पोलीओ डोस देण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे. तसेच प्रत्येक लाभार्थ्याला  पल्स पोलिओ मोहिमेची पुढील तारीख १ नोव्हेंबर असल्याची माहिती देण्यात आलेली आहे.
       
भारत देश कायमस्वरूपी पोलिओमुक्त रहावा यादृष्टीने ही उपराष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम महत्वाची  असून त्याला नवी मुंबईकर नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला. तरी ज्या बालकांनी बुथवर डोस घेतलेला नाही अशा बालकांच्या घरांना भेट देणा-या स्वयंसेवकांना बालकांबाबत माहिती देऊन पोलिओ डोस पाजून घेणेबाबत सहकार्य करण्याचे आवाहन महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या वतीने करण्यात येत आहे.  






  

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या