पोलिसाने वाचवले आत्महत्या करणाऱ्या महिलेचे प्राण
दादासाहेब येंधे :
ठाण्यातील उपवन तलावात उडी मारुन आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या ४५ वर्षीय महिलेचे बीट मार्शल गजेंद्र सोनटक्के यांनी स्वतःच्या जीवाचीही पर्वा न करता प्राण वाचवले आहेत. या महिलेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती वर्तक नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गायकवाड यांनी दिली आहे.
या महिलेची ओळख पटली असून तिचे नाव गार्गी होमियार जीलार असे आहे. गार्गी यांनी शुक्रवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास ठाण्यातील उपवन तलावात उडी मारली. त्याच दरम्यान वर्तक नगर पोलीस ठाण्याचे बीट मार्शल राजेंद्र सोनटक्के हे त्यांच्या परिसरात गस्त घालत असताना तलावाजवळ गर्दी बघून सोनटक्के हे तलावाजवळ गेले. एक महिला तलावात बुडत असल्याचे बघून बीट मार्शल सोनटक्के यांनी कशाचाही विचार न करता थेट तलावात उडी मारून या महिलेला सुखरूप बाहेर काढून तिला आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने नजीकच्या रुग्णालयात दाखल केले असून पुढील तपास सुरू आहे.
डॉक्टरांनी तिला तपासून पुढील उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केले असून या महिलेच्या नातेवाईकांचा शोध घेण्यात येत असल्याची माहिती वर्तक नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांनी दिली आहे. या महिलेने आत्महत्या करण्याच्या उद्देशाने उपवन तलावात उडी मारली होती. मात्र, वर्तक नगर पोलीस ठाण्याचे बीट मार्शल गजेंद्र सोनटक्के यांनी वेळीच या महिलेचे प्राण वाचवले. यामुळे सर्व स्तरावर गजेंद्र सोनटक्के यांचे कौतुक होत असून जणू "खाकी वर्दीत देवच अवतरला" अशा भावना सर्वसामान्यांकडून उमटत आहेत.
सदर महिलेला वाचवतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठया प्रमाणात व्हायरल होत आहे.

0 टिप्पण्या