लालबागचा राजाचा आरोग्य उत्सवाची उद्यापासून सुरुवात
मुंबई, दादासाहेब येंधे : कोरोना च्या पार्श्वभूमीवर लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळाने यावर्षी आरोग्य उत्सव साजरा करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्या अनुषंगाने ३ ते ३१ ऑगस्ट दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या आरोग्यत्सवाची रूपरेषा नुकतीच जाहीर करण्यात आली.
या उत्सवाचा भाग असलेल्या प्लाझ्मादान शिबिराचे उद्घाटन ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांच्या हस्ते उद्या, ३ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजता लालबागचा राजा मार्ग, लालबाग मार्केट येथे होणार आहे.
केईएम रुग्ण रक्तपेढीचे सहकार्य प्लाझ्मादान शिबिरासाठी लाभणार असून ३ ऑगस्ट ते ऑगस्ट ३१ या कालावधीत सकाळी ९ ते १२ या वेळेत प्लाझ्मादान नोंदणी करता येणार आहे. याच कालावधीत गलवान खोऱ्यात चीनसोबत झालेल्या संघर्षात हुतात्मा झालेल्या जवानांना दोन लाख रुपये व शौर्यचिन्ह देऊन त्यांचा सन्मानही करण्यात येणार आहे. तसेच कोरोना विरोधी लढाईत जनतेची सेवा करताना मृत्युमुखी पडलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना रु. १ लाख व शौर्यचिन्हाने सन्मानित केले जाणार आहे. विशेष म्हणजे मुख्य उत्सवकाळात मंडळातर्फे कोविड योद्ध्यांचाही सन्मान केला जाणार असून, सकाळी १० ते ५ या वेळेत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे.

0 टिप्पण्या