पत्रकार, प्रेस कर्मचाऱ्यांनाही लोकल प्रवासास मुभा द्या - वृत्त रिपोर्टर (दादासाहेब येंधे) Vrutta Reporter

ब्रेकिंग

शनिवार, १५ ऑगस्ट, २०२०

पत्रकार, प्रेस कर्मचाऱ्यांनाही लोकल प्रवासास मुभा द्या

 कोरोना संकटात पत्रकार दुर्लक्षित

मुंबई, दादासाहेब येंधे : अत्यावश्यक सेवा, आरोग्य सेवा तसेच सरकारी कर्मचाऱ्यांना लोकल रेल्वेने प्रवास करण्याची सुविधा महाराष्ट्र सरकार कडून देण्यात आली आहे. मात्र, अत्यावश्यक सेवेत असलेल्या पत्रकारांना अजूनही या सुविधेपासून वंचित ठेवण्यात आले आहे.

केंद्र व राज्य सरकारने कोरोना संकटात पत्रकारांनाही अत्यावश्यक सेवेत समाविष्ट केलेले आहे. या काळात धोका पत्करून पत्रकार हे जनतेला माहिती देण्याची आणि कोरोनाविषयी जनजागृती करण्याचे काम करीत आहेत.सध्या पत्रकारांना अनेकदा वार्तांकन करण्याकरिता मुंबई, मुंबई उपनगर आणि कल्याण- डोंबिवली, वसई- विरार, वाशी-खारघर आदी अन्य शहरात जावे लागत आहे. त्यामुळे पत्रकारांनाही लोकल प्रवासाची सुविधा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी पत्रकार व प्रेस कर्मचाऱ्यांकडून करण्यात येत आहे.

जर सरकारने प्रेसला, पत्रकारांना अत्यावश्यक सेवेत समाविष्ट केले आहे तर मग त्यांना लोकल ट्रेनचा प्रवास सरकार का करू देत नाही..? केंद्र सरकार पत्रकारांना मुंबई लोकल सेवा का  नाकारत आहे...  हा पत्रकारांवर आणि प्रेस कर्मचाऱ्यांवर अन्याय नाही का..? इतर वेळेस प्रत्येकाला स्वतःचा मोठेपणा मिरवण्यासाठी, स्वतःच्या बातम्या छापण्यासाठी पत्रकारांची गरज भासते. सरकारच्या बातम्या छापण्यासाठीही पत्रकारांना बोलावले जाते. मग लॉक डाऊनच्या काळात पत्रकारांनी वृत्तसंकलन करण्यासाठी विरार वरून चर्चगेटला जायचं कसं..? कल्याण, डोंबिवली वरून सीएसएमटी ला, मंत्रालय, महानगरपालिका येथे यायचं जायचं कसं हा प्रश्न पत्रकारांसमोर उभा ठाकला आहे.

एसटी बस सुरू आहेत. पण, त्याही कमी पडतात. बेस्टच्या बसही कमी पडतात. एका सीटवर एकच व्यक्ती आणि पाच उभे प्रवासी. अशी बेस्टमध्ये प्रवासी संख्या असल्यामुळे बस वाहक बस स्टॉप वर बस थांबवत नाहीत. एक-दीड तास पत्रकार आणि प्रेस कर्मचारी रस्त्यावर उभे राहून बेस्ट बसची वाट बघत आहेत.  प्रवाशी संख्या जास्त होत असल्याने बसमधून खाली उतरवले जाते. न उतरल्यास बस पोलीस ठाणेत घेऊन जाऊ का, असे दरडावले जाते किंवा जोपर्यंत तुम्ही बसमधून खाली उतरणार नाही तोपर्यंत बस रस्त्याच्या बाजूला उभी करून ठेवली जाते.

आज घडीला लॉकडाउनच्या काळात अनेक वृत्तपत्रांच्या मालकांनी, चॅनेलवाल्यांनी अनेक पत्रकारांना कामावरून काढून टाकले आहे. कामगार कपात केली आहे. अशावेळी सरकार असो की कोणतीही सामाजिक संघटना पत्रकारांना कुणीही मदत करण्यास पुढे येत नाही. ज्यांच्या जाहिराती छापल्या तेही पैसे द्यायला तयार होत नाहीत. मग, पत्रकारांनी आणि प्रेस कर्मचाऱ्यांनी जगायचं तरी कसं... हा मोठा गहन प्रश्न सध्या उपस्थित होत आहे. त्यामुळे मायबाप सरकारने पत्रकारांनाही मुंबईत लोकल प्रवास करण्याची मुभा लवकरात लवकर द्यावी. 




ता.क. :- पत्रकार इतरांसाठी आपली लेखणी चालवितात, सामान्यांना, अडल्या-नडलेल्याला न्याय मिळवून देतात. पण, त्या पत्रकाराला मात्र, स्वतःच्या हक्कापासून वंचित राहावे लागते.. तेही तोंड दाबून बुक्क्यांचा मार...


५ टिप्पण्या:

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज