मुंबई, दादासाहेब येंधे : मुंबई महानगर प्रदेशात भररस्त्यात ज्येष्ठ नागरिकांना भीती घालून, प्रलोभन दाखवून हातचलाखीने लुटणाऱ्या बोलबच्चन टोळीला साकीनाका पोलिसांनी डोंबिवली आणि शिर्डीतून बेड्या ठोकल्या. या टोळीकडून सुमारे १५ लाख रुपये मूल्याचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले.
या टोळीविरोधात मुंबई महानगर प्रदेशात एकूण ३२ गुन्ह्यांची नोंद आहे. अटकेनंतर या टोळीने केलेल्या एकूण १३ गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले.
संतोष गंगाराम चौरे (५५, अकोले), बालाजी रोहिदास पवार (२५, परभणी) आणि लक्ष्मण रोहिदास पवार (२२, परभणी) अशी टोळीतील अटक आरोपींची नावे आहेत. हे गेले काही महिने कल्याण परिसरात वास्तव्यास होते. यातील संतोषविरोधात याआधीचे २६ तर बालाजी व लक्षणविरोधात प्रत्येकी तीन लूटमार, फसवणुकीचे गुन्हे नोंद आहेत.
ही टोळी रस्त्यावरून एकाकी पायी जाणाऱ्या वृद्ध नागरिकांना लक्ष्य करते. कधी पोलिस असल्याचे भासवून पुढे हत्या झाली आहे, दंगल भडकली आहे. आदी वेगवेगळी कारणे सांगून भीती घालते आणि सुरक्षितता म्हणून अंगावरील सोन्याचे दागिने काढून पिशवीत ठेवा, अशी सूचना करते, तर कधी मालकास बऱ्याच वर्षांनी मुलगा झाला आहे. त्या निमित्त तो गोरगरिबांना साडी वाटतो आहे. गरीब भासण्यासाठी अंगावरील दागिने काढून ठेवण्याचा सल्ला देते. पुढे या वृद्धांना मदत करण्याच्या बहाण्याने हातचलाखीने दागिने स्वतःकडे घेऊन पोबारा करते.
२४ मार्च रोजी साकीनाका येथील मोहिली गाव परिसरात एका वृद्धेस अशाच प्रकारे लुटण्यात आले. साकीनाका पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक राजेंद्र नागरे आणि त्यांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने तांत्रिक तपासा आधारे चौरे यास डोंबिवलीतील निवळी फाटा परिसरातून अटक केली. त्याच्या चौकशीतून लक्षण, बालाजी शिर्डीत असल्याची माहिती पुढे आली. त्यानुसार दोघांना तेथून अटक केली गेली.
0 टिप्पण्या