मुंबई, दि. १४ : 'शारदा प्रकाशन' व 'भायखळा म. न. पा. शाळा माजी विद्यार्थी संघ' यांनी आयोजित केलेला, कवयित्री दया घोंगे लिखित 'कृतार्थ' व 'रत्नाक्षरे' (द्वितीय आवृत्ती) या दोन पुस्तकांचा प्रकाशन सोहळा दि. ९ मे रोजी डोंबिवली येथे उत्साहात संपन्न झाला. प्रा. विसुभाऊ बापट ('कुटुंब रंगलंय् काव्यात ' चे सादर कर्ते) यांच्या हस्ते झालेल्या या प्रकाशन सोहळ्यात सौ. उमा बापट, डॉ. संतोष राणे इ. ज्येष्ठ साहित्यिक उपस्थित होते. सौ. उमाताईंनी या दोन्ही पुस्तकांचे अत्यंत सखोल अभ्यासपूर्ण असे विवेचन केले. जवळजवळ सर्व कवितांचा परिचय करून देत रसिकांनी हे पुस्तक आवर्जून वाचावे असे आवाहन केले.
कार्यक्रमाच्य दुसऱ्या सत्रात ' मातीतील मोती ' हा हृद्य सत्कार समारंभ झाला. यात ACP रवींद्र दौंडकर, ACP किशोर शिंदे, डॉ. गोरक्ष धोत्रे या सामान्य परिस्थिती तून वर आलेल्या, पण आज स्वकर्तृत्वाने यशाचे शिखर गाठलेल्या अशा, शाळेच्या माजी विद्यार्थ्यांचा दया घोंगे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.' शाळेच्या वास्तूची माती ही पवित्र असतेच. त्याच मातीत उगवलेले हे बहुमोल मोती आहेत ' अशा शब्दात त्यांचा गौरव दया घोंगे यांनी केला.'शिष्यात् इच्छेत् पराजयम्' या संस्कृत वचनाचा संदर्भ देऊन, शिष्याकडून पराजय होण्यातच गुरूची जीत असते असे आवर्जून सांगून, आज खरोखर कृतार्थ झाल्याचे त्यांनी सांगितले.
तिसरे सत्र 'गुण गौरव ' हे होते. व्यवसायासाठी अध्यापनक्षेत्र निवडलेल्या गुणी शिक्षकांचा, व इतर कला गुण अंगी असणाऱ्यांचा या वेळी गौरव करण्यात आला. यात प्राजक्ता कुलकर्णी, मंजिरी पैठण कर, पद्माकर भावे, गायत्री रॉय, कैलास बडगुजर, मंजुषा बुरुजवाले, स्वाती नातू तसेच रवींद्र कारेकर, संपत वरे , शमिका केळकर, वर्षा पाटील यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
या शिवाय, निरपेक्ष सेवावृत्तीबद्दल आनंद खेडकर व संजय ताम्हाणे यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमात रवींद्र कारेकर यांची सरस्वतीवंदना व शमिका केळकर हिने गायलेली राष्ट्रवंदना यांनी रसिकांचे मन जिंकून घेतले. वर्षा पाटील यांनी मान्यवरांचा व माधुरी डोंगरे यांनी दया घोंगे यांचा सुंदर परिचय करून दिला. आनंद खेडकर यांचे उत्स्फूर्त व खुसखुशीत सूत्र संचालन सर्वांचीच वाहवा मिळवून गेले. शेवटी मंजिरी पैठणकर यांनी आभारप्रदर्शन केले. हा सर्व कार्यक्रम यशस्वी करण्यात दया घोंगे यांची मुलगी उन्नती व सून स्वाती यांनी मोलाचा वाटा उचलला.

0 टिप्पण्या