Ticker

6/recent/ticker-posts

मुंबई पोलिसांची गुजरातमध्ये धडक कारवाई; ७४ कोटींचा अमली पदार्थ कारखाना उद्ध्वस्त

मुंबई, दादासाहेब येंधे :  मुंबई पोलिसांनी गुजरातमध्ये सुरू असलेला एक बेकायदा कारखाना उद्ध्वस्त केला आहे. साकीनाका पोलिसांनी राज्याच्या सीमापार जाऊन केलेल्या या कारवाईत सुमारे ७४.७६ कोटी रुपयांचे अमली पदार्थ, रसायने आणि उत्पादनासाठी वापरली जाणारी यंत्रसामग्री जप्त केली आहे. या कारवाईत पोलिसांनी मुस्कान समीर खान या महिलेसह वझुल कमर अब्दुल वफा चौधरी ऊर्फ पप्पू या दोघांना अटक केली आहे. 

सदर कारवाई मुंबईतील साकीनाका पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या अमली पदार्थ तस्करीच्या गुन्ह्याच्या तपासातून समोर आली. तपासादरम्यान पोलिसांना गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणात अमली पदार्थांची निर्मिती सुरू असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर विशेष पथकाने गुजरातमध्ये छापा टाकत कारखाना नेस्तनाबूत केला. छाप्यात पोलिसांना 'मेफेड्रोन' या कृत्रिम अमली पदार्थाच्या निर्मितीसाठी वापरली जाणारी रसायने, तयार माल आणि उत्पादनासाठी आवश्यक उपकरणे सापडली. हा कारखाना मोठ्या प्रमाणावर अमली पदार्थ तयार करून विविध राज्यांमध्ये पुरवठा करत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

सदरची कारवाई मुंबई पोलिसांनी थेट गुजरातमध्ये जाऊन केली. अमली पदार्थांचे जाळे एका राज्यापुरते मर्यादित नसल्याने तपासासाठी विविध राज्यांतील यंत्रणांमध्ये समन्वय आवश्यक ठरतो. या प्रकरणातही मिळालेल्या गुप्त माहितीनुसार पोलिसांनी सीमापार कारवाई करत संपूर्ण उत्पादन केंद्रच उद्ध्वस्त केले.

या कारखान्याचा संबंध कोणत्या तस्करांशी आहे, अमली पदार्थांचा पुरवठा कोणत्या राज्यांमध्ये होत होता आणि या व्यवहारामागे किती मोठे आर्थिक जाळे कार्यरत होते, याचा तपास सुरू आहे. जप्त करण्यात आलेल्या साहित्याच्या आधारे पोलिसांनी काही संशयितांची माहिती मिळवली असून लवकरच आणखी अटकसत्र होण्याची शक्यता आहे.

गुजरातच्या नर्मदा जिल्ह्यातील नांदोद-राजपिलला तालुक्याच्या वरखड परिसरात संशयित आरोपींनी एक भाड्याने फ्लॅट घेतले असून तिथेच एमडी ड्रग्ज बनविले जात असल्याची माहिती उघडकीस आली होती. या माहितीची शहानिशा करण्यासाठी पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे, एसीपी प्रदीप मैराळे, प्रभारी पोलीस निरीक्षक सपना क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दिपक गिरमे, एपीआय काशिनाथ वणवे, पोलीस उपनिरीक्षक पंकज परदेशी, पोलीस हवालदार शशिकांत पाटील, चंद्रकांत पवार, नितीन खैरमोडे, पोलीस शिपाई अनिल करांडे यांनी तिथे छापा टाकला. या फ्लॅटमध्ये एमडी ड्रग्ज बनविले जात असल्याचे उघडकीस आले. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या