मुंबई, दादासाहेब येंधे : मुंबईतील काळाचौकी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका जैन मंदिरात झालेली १ कोटी ७५ लाख रुपयांची मोठी चोरी उघडकीस आणण्यात पोलिसांना अखेर यश आले आहे. अवघ्या ४८ तासांत सराईत गुन्हेगाराला मध्य प्रदेशातून ताब्यात घेऊन चोरीला गेलेला सर्व मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
सदरची जबरी चोरी ही ३० मार्च रोजी पहाटे २ ते ५ च्या दरम्यान मुंबई लालबाग येथील उच्छभ्रू सोसायटीच्या आवारात असलेल्या जैन मंदिरात घडली होती. अज्ञात चोरट्याने मंदिरात प्रवेश करून सोन्याचे दागिने आणि मौल्यवान हिरा असा एकूण १ कोटी ७५ लाख रुपयांचा ऐवज लंपास केला होता. याप्रकरणी काळाचौकी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता.
तपासादरम्यान पोलिसांनी काळाचौकी परिसरातील आणि मुंबई हद्दीतील सुमारे २०० ते ३०० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले असता संशयित आरोपी हा त्याच मंदिरात यापूर्वी सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत होता. तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपी मध्य प्रदेशात पळून गेल्याचे निष्पन्न झाले.
काळाचौकी पोलिसांचे पथक तात्काळ मध्य प्रदेशात रवाना झाले. आरोपी जितेंद्र उर्फ जितन उर्फ बंटी उर्फ पंडित नगाईच (वय,३४) हा त्याच्या गावातील नातेवाईकाच्या घराच्या छतावर लपून बसला होता. पोलिसांनी त्याला घेरले असता, त्याने स्वतःला वाचण्यासाठी एका छतावरून दुसऱ्या छतावर उड्या मारून पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र पथकाने त्याला शिताफीने ताब्यात घेतले.
अटक करण्यात आलेला आरोपी जितेंद्र हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर मध्य प्रदेशात आर्म्स ॲक्ट आणि लूटमारीसारखे तब्बल १७ गंभीर गुन्हे दाखल आहेत. आरोपी जितेंद्र हा पूर्वी सोसायटीत सुरक्षा रक्षक म्हणून नोकरीला होता, काही महिन्यांपूर्वी त्याला कामावरून काढण्यात आले होते अशी माहिती पोलीस उपायुक्त,परिमंडळ-४ आर.रागसुधा यांनी दिली.


0 टिप्पण्या