मुंबई, दादासाहेब येंधे : शहरात ज्येष्ठ नागरिकांना टार्गेट करत एटीएम कार्डची अदलाबदली करून फसवणूक करणाऱ्या आरोपीविरोधात दिंडोशी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणात एका आरोपीला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून अनेक एटीएम कार्ड आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे.
हा आरोपी ओडिशा राज्यातून विमानाने मुंबईत येऊन एटीएम मशीनमध्ये पैसे काढणाऱ्या वयस्कर नागरिकांना बोलण्यात गुंतवून त्यांचं कार्ड बदलून फसवणूक करत असे.
मालाड पूर्वेतील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेलेल्या एका वरिष्ठ नागरिकाला आरोपीने मदत करण्याच्या बहाण्याने एटीएम कार्ड बदललं आणि ४० हजार रुपयांची फसवणूक केली.
या घटनेनंतर दिंडोशी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. रस्त्यावरील ६० ते ७० सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी आरोपीचा माग काढला. यानंतर नायगाव पूर्व परिसरातून आरोपीला अटक करण्यात आली.
अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव संभवकुमार कृष्णचंद्र आचार्य (वय, ३५) असून त्याच्याकडून पोलिसांनी चोरीची रोख रक्कम, विविध बँकांचे २५ एटीएम कार्ड आणि दोन मोबाईल जप्त केले आहेत.
या आरोपीविरुद्ध मुंबईतील विविध पोलीस ठाण्यांमध्ये अशाच प्रकारचे गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. वरिष्ठ नागरिकांना मदत करण्याच्या बहाण्याने तो एटीएम कार्ड बदलत असल्याचं उघड झालं आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.
0 टिप्पण्या