Ticker

6/recent/ticker-posts

मोबाईल चोरांच्या आंतरराज्य टोळीला अटक

मुंबई, दादासाहेब येंधे : मोबाईल चोरीच्या गुन्ह्यांतील सहा रेकॉर्डवरील आरोपींना जे जे मार्ग पोलीस ठाणे यांनी नुकतीच अटक केली आहे. साकीब अश्फाख खान, सरताज शेख, आमिर आबीद खान, इस्तियाक साजिद खान, गोहर गुलाम जिलानी आणि अजफल नाई अशी या सहा जणांची नावे असून ते सर्वजण उत्तर प्रदेश येथील आहेत. या आरोपींकडून पोलिसांनी १५ लाख रुपयांचे ५२ पेक्षा अधिक चोरीचे मोबाईल जप्त केले आहेत. तर त्यांच्या अटकेमुळे १६ मोबाईल चोरीच्या गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना मोठे यश प्राप्त झाले आहे. न्यायालयाने या आरोपींना पोलीस कोठडी सुनावली आहे.

२६ जानेवारीला इफ्तार पार्टीचे सामान घेण्यासाठी आलेल्या एका तरुणाचा अज्ञात व्यक्तीने मोबाईल चोरी केला होता. याप्रकरणी जे जे मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच पोलिसांनी आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात केली. सदर आरोपींना पकडण्यासाठी पोलीस पथक बोहरी मोहल्ला, मस्ताव तलाव, नळबाजार या परिसरात साध्या वेशात पाळत ठेवून ग्रस्त घालत होते. यादरम्यान एका संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले.  त्याच्या चौकशीतून त्याच्या इतर पाच सहकाऱ्यांना वेगवेगळ्या परिसरातून पोलिसांनी अटक केली.


मोबाईल चोरी करणारी ही आंतरराज्य टोळी असून या टोळीने मुंबईसह उत्तर प्रदेशात मोठ्या प्रमाणात मोबाईल चोरी केले आहेत. ही टोळी राजकीय सभा, धार्मिक कार्यक्रम तसेच इतर ठिकाणी होणाऱ्या गर्दीचा फायदा घेऊन मोबाईल चोरी करत होते. चोरीचे मोबाईल नेपाळ, बांगलादेशात पाठवून तिथे त्याची स्वस्त विक्री केली जात होती. शिवडी आणि ताडदेव येथे झालेल्या कार्यक्रमांतही त्यांनी मोबाईल चोरी केल्याचे तपासून समोर आले आहे. मुंबईतील बहुतांश पोलीस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल असून त्यांच्या अटकने जवळपास दीडशे ते दोनशेहून अधिक मोबाईल चोरीच्या गुन्ह्यांची उकल होण्याचे शक्यता आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या