मुंबई, दादासाहेब येंधे : सायबर गुन्ह्यात संपर्कासाठी सिमकार्ड आणि पैसे स्वीकारण्यासाठी बँक खात्यांची गरज असते. बोगस कंपन्यांच्या नावे बँक खाती उघडून ती सायबर ठगांना विकणाऱ्या दोन जणांच्या गुन्हे शाखेने मशिद बंदर येथे मुसक्या आवळल्या आहेत. या दोघांनी तब्बल ५५ बँक खाती सायबर चोरांना पुरवल्याचे तपासातून उघड झाले आहे. सदर खात्यांवर कोट्यावधी रुपयांचे व्यवहार देखील झालेले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शाकीब नवाज शोरत अली खान आणि जमीर अहमद मोहम्मद जावेद अन्सारी यांनी कागदोपत्री नऊ बोगस कंपन्या बनवल्या. या कंपन्यांच्या नावे विविध बँकांमध्ये तब्बल ५५ खाती उघडली. त्यात काही बचत तर काही करंट खात्यांचा समावेश आहे. याबाबतची माहिती गुन्हे शाखेच्या युनिट-३ चे प्रभारी पोलीस निरीक्षक सदानंद येरेकर यांना मिळाली. त्या माहितीच्या आधारे युनिट-३ च्या पथकाने मशिद बंदर येथील मांडवी परिसरात छापा टाकून आरोपींच्या मुसक्या आवळल्या.
ही खाती सायबर ठगांना आर्थिक फसवणुकीसाठी पुरवल्याचे कबूल केले आहे. वेगवेगळ्या निमित्ताने नागरिकांना फसवणूक करून मिळवलेली रक्कम आरोपींनी पुरवलेल्या खात्यांवर जमा होत असे आणि तेथून विविध खात्यांवर वळती केली जात असल्याचे तपासातून उघड झाले आहे. आरोपींच्या ५५ खात्यांवरून अद्यापपर्यंत कोट्यावधींचे व्यवहार झालेले असून बँक खात्यांवरून रक्कम वळती करण्यात आलेल्या पुढील खात्यांची साखळी शोधण्याचे काम सुरू असल्याचे पोलिसांनी कळवले आहे.
0 टिप्पण्या