मुंबई, दादासाहेब येंधे : बांगलादेशी घुसखोरांना बनावट शिधापत्रिका व अन्य कागदपत्रे तयार करून देत शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणाऱ्या टोळीला दिंडोशी पोलिसांनी नुकतीच अटक केली आहे. अटक केलेल्या आरोपींमध्ये बनावट कागदपत्रे तयार करण्यापासून महानगर प्रदेशातील एजंटांचा समावेश असल्याचे सांगण्यात आले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बांगलादेशी घुसखोरांना भारतीय विशेषतः मुंबई तसेच आसपासच्या उपनगरातील अधिवास स्पष्ट करण्यासाठी शिधापत्रिका, आधार कार्डची गरज भासते. त्यासोबत आर्थिक दुर्बल घटकांसाठी मोफत सेवा देणाऱ्या महात्मा जोतिबा फुले, जन आरोग्य योजना, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि अन्य शासकीय योजनांचा लाभ लागण्यासाठी किंवा तो लाभ मिळवून देण्यासाठी बनावट शिधापत्रिकांची आवश्यकता भासते. ही बनावट कागदपत्रे तयार करून देणाऱ्या सुजल दयाळ या आरोपीस गेल्या आठवड्यात पोलिसांनी अटक केली होती. तेव्हा त्याच्या ताब्यातून बनावट झोपडपट्टी फोटो पास पावती, तीन एमएमआरडीएची ताबापत्रे आणि तीन कोऱ्या शिधापत्रिका जप्त करण्यात आल्या. पथकाने विरार येथील सुजलच्या निवासस्थानी छापा घातला असता तेथून ३४३ बनावट शिधापत्रिका, लॅपटॉप, प्रिंटर, कागद जप्त केले.
0 टिप्पण्या