Ticker

6/recent/ticker-posts

कुरिअर कंपनीच्या फ्रँचायझीचे आमिष; १४.४ लाखांची फसवणूक, नऊ जणांना अटक

मुंबई, दादासाहेब येंधे : वेगवेगळ्या नामांकित कुरिअर कंपन्यांची फ्रँचायझी मिळवून मोठा आर्थिक फायदा करून देण्याचे आमिष दाखवत नागरिकांची फसवणूक करणाऱ्या कॉल सेंटरवर मुंबई गुन्हे शाखेच्या कक्ष-१० ने छापा टाकला आहे. या कारवाईत नऊ जणांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याकडून ३५ लॅपटॉप, १०५ हार्ड डिस्क, २९ मोबाइल फोन आणि चार टॅब असा सुमारे २४ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. 



मालाड पश्चिम येथील लिंक रोड परिसरात 'इन्स्टा ट्रान्सफर ब्रिज प्रायव्हेट लिमिटेड' या ठिकाणी बेकायदा पद्धतीने कॉल सेंटर चालविले जात असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. या कॉल सेंटरमधून टेलिकॉलरद्वारे महाराष्ट्राबाहेरील नागरिकांशी संपर्क साधला जात होता. 

आरोपी नागरिकांना ॲमेझॉन, फ्लिपकार्ट, मिंत्रा, ब्लू डार्ट, डीटीडीसी, बिग बास्केट यांसह विविध कुरिअर कंपन्यांशी करार असल्याचे सांगत होते. या कंपन्यांची फ्रँचायझी घेऊन व्यवसाय केल्यास मोठा आर्थिक फायदा होईल, असे सांगून नागरिकांकडून आर्थिक गुंतवणूक करून घेतली जात होती. मात्र, त्यानंतर संबंधितांची फसवणूक केली जात असल्याचे तपासात समोर आले. 

गुन्हे शाखेच्या कक्ष-१०च्या पथकाने वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली संबंधित ठिकाणी छापा टाकून चौकशी केली. या चौकशीत अनेक नागरिकांची एकूण १४ लाख ४० हजार रुपयांची फसवणूक झाल्याचे आढळून आले. त्यानंतर आरोपींविरुद्ध बांगूरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी देवेंद्र अरविंद विरकर (३२), कमलेश मोहन शहा (४०), नफिस अन्सारी (३४), दानिश अमीर बेग (३२), सत्यप्रकाश लाल यादव (३४), मोहम्मद शेख (३०), साहिल अस्मल वारुणकर (३१), शिवा बाबुराव बसते (२७) आणि गौतम सी. एल. (२५) यांना ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम ३१८(४), ३(५) तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६६(डी) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या