Ticker

6/recent/ticker-posts

ज्येष्ठ व्यावसायिकाची शेअर मार्केट गुंतवणुकीत फसवणूक, सात जणांना अटक

मुंबई, दादासाहेब येंधे : ज्येष्ठ व्यावसायिकाला व्हाट्सअप्प ग्रुपद्वारे संपर्क साधून शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यास भाग पाडून १० कोटी ९८ लाख रुपयांना फसविल्याप्ररकणी दक्षिण प्रादेशिक सायबर पोलिसांनी सात जणांच्या यूपी, बिहार, ओडिशा, हरयाणा आणि महाराष्ट्रातून मुसक्या आवळल्या आहेत. अटक केलेल्या आरोपींच्या बँक खात्यात फसवणुकीचे पैसे जमा झाले होते.

होशनाक वाजिफदार (वय, ६१) हे ज्येष्ठ व्यावसायिक चर्चगेट येथे राहतात. वाजिफदार यांना अज्ञात व्यक्तीने व्हाट्सअप्प ग्रुपद्वारे संपर्क साधून शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल अशी बतावणी केली होती. त्या आमिषाला बळी पडत वाजिफदार यांनी गुंतवणूक करण्यास सुरुवात केली. प्रथम त्यांना आरोपींनी त्यांच्या मोबाईमध्ये एक ॲप डाउनलोड करण्यास सांगितले. त्यानंतर २९ डिसेंबर २०२५ ते १७ जानेवारी २०२६ या कालावधीत सायबर गुन्हेगारांनी वाजिफदार यांना गोड बोलून गुंतवणूक करण्यास भाग पाडून त्यांची  दहा कोटी ९८ लाख ६५ हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केली.

आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात येताच वाजिफदार यांनी दक्षिण सायबर पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. याप्रकरणी गुन्हा दाखल करून वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली वेगवेगळी पथके तयार करून आरोपींचा शोध सुरू करण्यात आला. या गुन्ह्यात फरार असलेल्या आरोपींना यूपी, बिहार, ओडिशा, हरयाणा व महाराष्ट्र राज्यांतून अटक केली.  पुंवरलाल येळे (वय, ५७), आदर्शसेन आनंद (वय, २७), अर्मत्यसेन आनंद (वय, २३), सुनील गुप्ता (वय, ४१), रसराज बाऊरी (वय, ३२), संजय सिंग (वय, ५१) आणि खिरोद साहू (वय, ५७) अशा सात जणांना अटक करण्यात आली असून तब्बल दोन कोटी ६० लाख रुपये अटक केलेल्या आरोपींच्या बँक खात्यात जमा करण्यात आली होते. एनसीआरपीच्या तक्रारीनुसार या आरोपींच्या खात्यात एपूण १३ कोटी ९८ लाख ६९ हजार ५४६ रुपये जमा झाल्याचे समोर आले आहे.  विशेष म्हणजे, तक्रारदारांनी गोल्डन अवरमध्ये १९३० हेल्पलाईनवर तक्रार केल्याने दोन कोटी १३ लाखांची रक्कम गोठविण्यात सायबर पोलीसांना यश आले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या