Ticker

6/recent/ticker-posts

विवाहबाह्य संबंधातून हत्या, पत्नीच्या प्रियकराला अटक

मुंबई, दादासाहेब येंधे : जुहू कोळीवाडा येथील समुद्रकिनारी सोमवारी एका गोणीमध्ये सापडलेल्या मृतदेहाच्या अवशेषांचे गूढ उकलण्यात सांताक्रूझ पोलिसांना यश आले. मृत तरुण मालवणी परिसरातून बेपत्ता झाला होता. त्याची हत्या केल्याप्रकरणी पोलिसांनी त्याचा मित्र वाहिद अली शेख उर्फ मिट्टू (३०) याला अटक केली आहे. विवाहबाह्य संबंधांमध्ये अडसर ठरत असल्याने वाहिद याने त्याचा काटा काढल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जुहू कोळीवाडा येथील समुद्रकिनाऱ्यावर गस्त घालत असताना पोलिसांना एक गोणी दिसली. संशयास्पद वाटल्याने गस्तीवरील पोलिसांनी जीवरक्षकाच्या मदतीने ती उघडली असता, आतमध्ये अर्धवट आणि कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह सापडला. पोलिसांनी हा मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला.

वरिष्ठ पोलिस निरीक्षक योगेश शिंदे आणि सखाराम मोले यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक तुषार सावंत, सुयोग अमृतकर, भूषण मोरे, विजय खंडागळे, उपनिरीक्षक समीर बोडके यांची पथके तपास कामी लावण्यात आली. मृतदेहाची ओळख पटविण्यास प्राधान्य असल्याने प्रथम सर्व पोलिस ठाण्यांतील हरविलेल्या व्यक्तींची माहिती घेण्यात आली. त्यावेळी मालवणीतून बेपत्ता झालेल्या तरुणाची माहिती मिळाली.

मूळचा उत्तर प्रदेश येथील हा तरुण हा पत्नीसह मालवणी येथे वास्तव्यास होता. तो बेपत्ता असल्याचे समजताच पोलिसांनी मालवणी परिसर पिंजून काढला. सीसीटीव्ही फुटेज आणि प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, त्याला ओळखणाऱ्या वाहिद याला ताब्यात घेण्यात आले. वाहिद आणि मृताची पत्नी यांच्यात प्रेमसंबंध असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्याचबरोबर तो अखेरचा वाहिद याच्यासोबत दिसल्याचे अनेकांनी सांगितले.

पोलिसांनी कसून चौकशी केली असता वाहिद याचा गारमेंटचा कारखाना असून सर्व कामगार गेल्यानंतर त्याने या तरुणाला बोलावून घेतले. त्याला दारू पाजून धारदार शस्त्राने त्याची हत्या केल्यानंतर मृतदेहाचे तुकडे करून गोणीत भरले. पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने त्याने मृतदेह समुद्रात फेकल्याचे चौकशीतून स्पष्ट झाले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या