प्रॉपर्टीसाठी सुनेने सासूला मारले
मुंबई, दादासाहेब येंधे : घाटकोपर (पश्चिम) परिसरात हिमालय सोसायटीमधील ६५ वर्षीय शहनाज काझी या महिलेचा मृतदेह त्यांच्या घरात आढळला होता.
सुरुवातीला मृत्यूचा प्रकार अस्पष्ट असला तरी पोलिस तपासात हा स्पष्टपणे खून असल्याचे उघडकीस आले. या प्रकरणी पोलिसांनी मृत महिलेची सून मुमताज इरफान खान (वय, ५० वर्षे) हिला अटक केली असून, तिनेच सासूची हत्या केल्याची कबुली दिली आहे. बुधवारी २६ नोव्हेंबर २०२५ रोजी सायंकाळी शहनाज यांच्या बहिणीने त्यांना फोन करण्याचा प्रयत्न केला. वारंवार कॉल करूनही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे शंका आल्याने त्यांनी शेजारी राहणाऱ्या सायका अन्सारी यांच्याशी संपर्क साधला. सायका लगेच शहनाज यांच्या घरासमोर गेल्या. त्यांनी बराच वेळ दरवाजा ठोठावला, आवाज दिला, मात्र कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. ही बाब सायकाने पुन्हा त्यांच्या बहिणींना कळवली.
परिसरातील एका महिलेकडे शहनाज यांच्या घराची दुसरी चावी असल्याची माहिती समोर आल्यानंतर शहनाज यांच्या बहिणींनी सायकाला ती चावी घेऊन आत काय परिस्थिती आहे ते पाहण्यास सांगितले. सायका यांनी घर उघडल्यानंतर त्यांना आत भीषण दृश्य दिसले शहनाज या घरातच रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या होत्या.
घाटकोपर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेण्यात आला. शवविच्छेदन अहवालात शहनाज यांच्या डोक्यावर गंभीर मारहाण झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर हा मृत्यू अपघाती नसून थेट खून असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे पोलिसांनी तात्काळ हत्या प्रकरणाचा गुन्हा दाखल केला आणि तपासासाठी वेगवेगळी दहा पथके तयार केली. या पथकांनी सोसायटीच्या आसपासचे सीसीटीव्ही फुटेज तपासायला सुरुवात केली. फुटेजमध्ये एका बुरखा घातलेल्या महिलेची संशयास्पद हालचाल आढळून आली. तिचा मागोवा घेत पोलिसांनी तपास वाढवला. अखेर ही महिला म्हणजेच शहनाज यांची सून मुमताज इरफान खान असल्याचे निष्पन्न झाले. तिला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आणि चौकशीत तिने गुन्ह्याची कबुली दिली.
तपासात समोर आले की, शहनाज यांच्या नावावर मोठ्या प्रमाणात मालमत्ता होती. मात्र त्या कोणालाही ती देण्यास तयार नव्हत्या. याच कारणावरून सून मुमताजने मालमत्ता मिळवण्याचा कट रचला. मुमताज बुधवारीच सासूच्या घरी गेली, वाद घातला आणि रागाच्या भरात तिने त्यांच्या डोक्यावर वार करून त्यांची हत्या केली. गुन्हा लपवण्यासाठी तिने घरातील दागिनेही घेऊन पळ काढल्याचे पोलिसांनी सांगितले. 
0 टिप्पण्या