Ticker

6/recent/ticker-posts

खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीला उत्तरप्रदेशातून ८ तासांत अटक

मुंबई, (दादासाहेब येंधे) : अंधेरी पूर्व येथे २६ नोव्हेंबर २०२५ रोजी पोलिसांना एका व्यक्तीचा मृतदेह मिळून आला होता. पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटवली असता अंधेरी परिसरात एका दुकानात काम करणारा मोहित सोनी (वय, २८ वर्षे) या व्यक्तीचा असल्याचे उघडकीस आले. तो मरोळ पाईप लाईन येथील आर. के. पोल्ट्री या दुकानात काम करत होता. अंधेरी पोलिसांनी ताबडतोब हत्येचा गुन्हा दाखल करून मोहित सोनीयाचा मोबाईल क्रमांकाचा सिडीआर(कॉल डेटा रेकॉर्ड)तपासले असता त्यात पोलिसांना एकाच क्रमांकावरून मोहितला १५ कॉल आले असल्याचे समजले. पोलिसांनी कॉल करणाऱ्याची माहिती काढली असता कॉल करणारी व्यक्ती मोहित सोनी याचा चुलत भाऊ मनोज सोनी असल्याचे समोर आले.

दरम्यान घटनेच्या दिवसाचे मनोज याचे लोकेशन तपासले असता मनोज हा मोहित सोबतच असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिस तपास पथकाने सीसीटीव्हीचे २५ हून अधिक फुटेज तपासले. त्यात आरोपी मनोज सोनी (वय, २५ वर्षे) आणि त्याचा साथीदार रोहित पाल (वय, २४ वर्षे) हे गुन्ह्यानंतर वांद्रे टर्मिनस येथून मुंबई बाहेर जाताना दिसले. दरम्यान, यूपीमध्ये दुसऱ्या तपासकामासाठी गेलेल्या मुंबई पोलिसांच्या पथकाला आरोपींचा फोटो देऊन लखनौ रेल्वे स्टेशनवर सतर्क करण्यात आले. लांब पल्ल्याच्या ट्रेनमध्ये दोघेही गुरुवारी जेरबंद करण्यात आले. पथक त्यांना घेऊन मुंबईकडे परतत आहे. या घटनेचा पुढील तपास अंधेरी पोलीस करत आहेत. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या