मुंबई, (दादासाहेब येंधे) : आरे कॉलनी परिसरात डोळ्यात लाल मिरचीची पावडर टाकून चोरी करणाऱ्या टोळीला अवघ्या सात तासांच्या आत पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
तक्रारदार मोहम्मद हनीफ साबुला खान (वय, ४५) यांनी २३ नोव्हेंबर रोजी आरे पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार त्यांच्या ओळखीची महिला सायरा आणि तिचा एक रिक्षा चालक असलेला साथीदार यांनी संगनमत करून त्यांना आरे डेरीच्या पाठीमागील एका निर्मनुष्य रस्त्यावर नेले. त्या ठिकाणी आधीच दबा धरून बसलेल्या दोघांनी तक्रारदार यांच्या डोळ्यात लाल मिरचीची पावडर टाकून पाच लाखांची सोन्याची चैन हिसकावली आणि तेथून त्यांनी पळ काढला. झटापटीत तक्रारदार यांच्या डोळ्यास गंभीर दुखापतही झाली आहे.
याबाबत तक्रार मिळताच वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार गुन्हे प्रकटीकरण अधिकारी पोउनि सचिन पांचाळ व पथकाने सदर गोष्टीचा तपास सुरू केला. घटनास्थळातील १७ फुटेज तपासले आरोपींचे चेहरे अस्पष्ट दिसत होते. त्यांची ओळख पटत नव्हती. सदर पोलीस पथकाने तांत्रिक कौशल्य व गुप्त बातमीदारांच्या मदतीने आरोपींची ओळख पटवली. त्यानंतर केवळ ७ तासांत चार आरोपींना बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश आले.
आरोपींकडून एकूण १० लाख ५० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यात सोन्याची चैन ५ लाख रुपये, पल्सर मोटरसायकल १ लाख रुपये तसेच ऑटो रिक्षा ४ लाख ५० हजार रुपये यांचा समावेश आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये विशाल सिद्धार्थ वाघ (वय,२७ वर्षे), नमेश नागेश सुर्वे (वय, २३ वर्षे), जहागीर सल्लाउद्दीन कुरेशी (वय, २५ वर्षे), व एक महिला शहरीन औरंगजेब कुरेशी (वय,२४ वर्षे) यांचा समावेश आहे. यापैकी विशाल वाघ यावर आधीपासूनच गंभीर आरोपांमध्ये सामील असलेले गुन्हे डोंबिवली पोलिसांत दाखल आहेत.
0 टिप्पण्या