Ticker

6/recent/ticker-posts

डिजिटल अरेस्ट फसवणूक प्रकणात १३ जणांना सायबर पोलिसांनी केली अटक

मुंबई, (दादासाहेब येंधे) : प्रादेशिक सायबर पोलिसांनी वाढत असलेल्या डिजिटल अरेस्ट प्रकारातील सायबर फसवणुकीविरुद्ध मोठे अभियान राबवले होते. महाराष्ट्रातील सात जिल्ह्यांत संयुक्त कारवाई करून तब्बल १३ जणांना अटक करण्यात आली आहे.  हे विशेष ऑपरेशन १८ नोव्हेंबर पासून सुरू करण्यात आले होते. सायबर पोलिसांच्या १३ पथकांनी एकत्रितपणे ही मोहीम राबवली आणि या दरम्यान ८ गुन्हे उघडकीस आणण्यास पोलिसांना यश मिळाले आहे.

मुंबई शहरात जानेवारी ते ऑक्टोबर २०२५ या काळात डिजिटल अरेस्ट फसवणुकीचे १४२ गुन्हे नोंदवले गेले आहेत. या गुन्ह्यांमध्ये नागरिकांची ११४ कोटी रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याचे उघडकीस आले आहे. वाढत्या तक्रारींमुळे  सायबर शाखेने या नव्या आणि धोकादायक अशा मोडस ऑपरेन्डीवर राज्यव्यापी धडक मोहीम सुरू केली आहे.


सायबर पोलिसांनी उघडकीस आणलेल्या आठ गुन्ह्यांममधील आरोपी नागरिकांना बँक खाते उपलब्ध करून देणे, खात्यांचे लॉगिन तपशील गुन्हेगारांना विकणे तसेच फसवणूक लपवण्यासाठी म्यूल अकाउंट होल्डर म्हणून काम करणे अशा गंभीर गुन्ह्यांमध्ये सामील असल्याचे समोर आले आहे. कारवाईदरम्यान अटक करण्यात आलेल्या १३ आरोपींची नावे सुनील भुजबळ, अनंत थोरात, जयेश बारापात्रे, विलास मोरे, रिजवान खान, कासिम शेख, आशिष भुसारी, जीवन बारापात्रे, यश यादव, मोहन सोनवणे, हितेश आणि अंकुश मोरे अशी आहेत.

वरील सर्व आरोपी महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमधून ताब्यात घेण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे. पोलिसांनी नागरिकांना डिजिटल अरेस्ट फसवणूक टाळण्यासाठी सतर्क राहण्याचे आव्हान केले आहे.

डिजिटल अरेस्ट पासून कसे वाचाल?

* कोणताही धोकादायक किंवा धमकीचा फोन आला तर त्वरित कॉल कट करा.

* लगेच सायबर हेल्पलाईन नंबर १९३० वर संपर्क साधा.

* आपले बँकखाते किंवा सिमकार्ड कुणालाही देऊ नका.

* सोशल मीडियावर वैयक्तिक माहिती पब्लिक मोडवर ठेवू नका.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या