मुंबई, (दादासाहेब येंधे) : मुलुंडमधील एका अपार्टमेंटमध्ये सुरू असलेल्या बेकायदा कॉलसेंटरवर कारवाई करीत मुलुंड पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे. आरोपी कर्जाच्या आमिषाने विदेशी नागरिकांची फसवणूक करुन त्यांच्याकडून घेतलेल्या प्रोसेसिंग फीचा अपहार करीत होते.
सागर राजेश गुप्ता (वय २७, राहणार मुलुंड), अभिषेक सूर्यप्रकाश सिंग (२८, मुलुंड), तन्मय कुमार रजनीश धाडसिंग (२७, बिहार), शैलेश मनोहर शेट्टी (२७, भाईंदर पूर्व), रोहन मोहम्मद अन्सारी (२८, ठाणे) अशी आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी टाकलेल्या छाप्यादरम्यान दोन लॅपटॉप, अकरा मोबाईल फोन, दोन वाय-फाय राउटर आणि ७६,०००/- रुपये पोलिसांनी जप्त केले आहेत. कॉल सेंटर म्हणून वापरल्या जाणाऱ्या घराला पोलिसांनी सील केले आहे.
अमेरिका आणि कॅनडासारख्या श्रीमंत देशांमध्येही अनेक लोकांना त्यांच्या गरजांसाठी कर्जाची आवश्यकता असते. या गोष्टीचा फायदा घेऊन मुंबईत घर घेऊन राहणाऱ्या आरोपींनी याचा फायदा घेतला. मुलुंडमध्ये अनधिकृत आंतरराष्ट्रीय कॉल सेंटर उघडले आणि अमेरिकन कंपनीचे अधिकारी असल्याचे भासवून अमेरिका आणि कॅनडामधील लोकांची फसवणूक करण्यास सुरुवात केली. मुलुंड येथे काहीजण बोगस आंतरराष्ट्रीय कॉल सेंटरच्या माध्यमातून विदेशी नागरिकांची फसवणूक करत असल्याची माहिती मुलुंड पोलिसांना मिळाली होती.
या माहितीची शहानिशा करण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय जोशी यांच्या पथकातील पोलीस निरीक्षक शिवाजी चव्हाण, एपीआय सुनिल करांडे, मनोज पाटील, उपनिरीक्षक शिवानंद आपुणे, पोलीस अंमलदार उरणकर, आव्हाड, विंचू, कट्टे, ढेबे, बनसोडे, पवार यांनी मुलुंड कॉलनीतील एका निवासी इमारतीच्या एका घरात छापा टाकत पाच जणांना अटक केली.
सागर गुप्ता याच्या मार्ग दर्शनानुसार आरोपी अमेरिका आणि कॅनडामधील नागरिकांना फसविण्यासाठी अमेरिकेतील लेंडिंग पॉईंट या वित्तीय कंपनीचे अधिकारी असल्याचे सांगत असत.आरोपी फिशिंग कॉल आणि मेसेजद्वारे पीडितांशी संपर्क साधत होते. जलद वैयक्तिक कर्ज देत होते. एकदा पीडितांना आमिष दाखवले की, फसवणूक करणारे गिफ्ट कार्ड आणि क्रिप्टोकरन्सीच्या स्वरूपात त्यांच्याकडून पैसे उकळत होते. सुरतमधील प्रशांत राजपूत नावाच्या एका सहकार्याच्या मदतीने हे पैसे भारतीय चलनात रूपांतरित केले जात होते. 
0 टिप्पण्या