Ticker

6/recent/ticker-posts

ड्रग्ज तस्कर अकबर खाऊच्या मुसक्या आवळल्या; ओडिशातून अटक

मुंबई, (दादासाहेब येंधे) : मुंबई पोलिसांच्या अँटी नॉरकोटिक्स सेल (एएनसी) ने एका मोठ्या ड्रग्ज प्रकरणात पाहिजे असलेला आरोपी अहमद मोहम्मद शफी शेख उर्फ अकबर खाऊ याला ओडिशामधून अटक केली आहे. अकबर खाऊ हा सराईत गुन्हेगार असून अनेक वर्षांपासून ड्रग्ज तस्करीच्या कामात सक्रिय होता.

घाटकोपर एएनसी युनिटने काही दिवसांपूर्वी ६४ ग्रॅम मेफेड्रोन (एमडी ड्रग्ज) जप्त केले होते, ज्याची किंमत अंदाजे १२.८ लाख रुपये आहे. या प्रकरणात एनडीपीएस कायद्यानुसार कलम ८ (सी), २२ (३), २२ (सी) आणि २९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. सर्वप्रथम आरोपी फरीद रहमतुल्ला शेख उर्फ फरीद चूहा याला अटक करण्यात आली होती. चौकशीत समोर आलं की अकबर खाऊ हा या संपूर्ण कटाचा मुख्य साथीदार होता. तो तेव्हापासून फरार होता.

गुप्त माहितीनुसार अकबर खाऊ ओडिशाच्या सुंदरगढ जिल्ह्यातील राजगांगपूर येथे लपून बसल्याचं कळलं. त्यानंतर एएनसीने तात्काळ कारवाई केली. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानंतर एक टीम ओडिशाकडे रवाना करण्यात आली आणि १ नोव्हेंबर रोजी राजगांगपूरच्या रब्बानी चौकात पोलिसांनी त्याला अटक केली. स्थानिक न्यायालयाने त्याला ट्रांझिट रिमांडवर मुंबईत पाठवण्याची परवानगी दिली. त्यानंतर त्याला मुंबईत आणून सेशन कोर्टात हजर करण्यात आलं, जिथून त्याला ७ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले. सध्या त्याची चौकशी सुरू आहे. या गुन्ह्यात आतापर्यंत एकूण दोन आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून १२ लाखांचा एमडी जप्त करण्यात आला आहे. पुढील तपास घाटकोपर अमलीपदार्थविरोधी कक्ष करत आहे.


अकबर खाऊ याच्यावर मुंबईतील विविध पोलिस ठाण्यांमध्ये अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यात चोरी, मारहाण तसेच एनडीपीएस कायदा व महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) अंतर्गत गुन्ह्यांचा समावेश आहे. कुर्ला पोलिस ठाणे, व्ही. बी. नगर पोलिस ठाणे आणि अमलीपदार्थविरोधी कक्ष या ठिकाणी मिळून १८हून अधिक गुन्हे त्याच्यावर दाखल असल्याची नोंद आहे.
१ नोव्हेंबर २०२५ रोजी रब्बानी चौक परिसरातून अकबर खाऊला अटक करण्यात आली. स्थानिक न्यायालयात हजर केल्यानंतर पोलिसांनी ट्रान्झिट रिमांड मिळवून आरोपीला मुंबईत आणले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या