Ticker

6/recent/ticker-posts

रोहित शेट्टीवर गोळीबार करणाऱ्यांना हरियाणातून मुख्य शूटरसह चौघांना अटक

मुंबई, दि. १७ : बॉलिवूडचे प्रसिद्ध निर्माते दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या जुहू येथील निवासस्थानी झालेल्या गोळीबार प्रकरणी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेला मोठे यश आले आहे.


हरियाणा स्पेशल टास्क फोर्सच्या मदतीने केलेल्या संयुक्त कारवाईत पोलिसांनी मुख्य शूटरसह चार आरोपींना बहादूरगड येथून अटक केली आहे. सदरच्या कारवाईमुळे या प्रकरणात आतापर्यंत ११ आरोपींना अटक झाली आहे.
३१ जानेवारी २०२६ च्या रात्री रोहित शेट्टी यांच्या घरावर गोळीबार करून चित्रपटसृष्टीत दहशतीचे वातावरण निर्माण करणे आणि खंडणी उकळणे, हा यामागचा मुख्य उद्देश होता. रितिक यादव, दीपक, सनी आणि सोनू, आग्रा आणि नोएडा (उत्तर प्रदेश) येथे राहणारे आहेत. या चौघांकडून मोबाईल फोन आणि गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे.

या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी आरोपींविरुद्ध 'मोक्का' (MCOCA) अंतर्गत कारवाई केली आहे. याशिवाय भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०९, महाराष्ट्र पोलीस कायदा आणि हत्यार कायद्याच्या विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जुहू पोलीस ठाण्यातून हा तपास आता गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी कक्षाकडे सोपवण्यात आला आहे.

अटक करण्यात आलेल्या चौघांना सोमवारी सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. सरकारी पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने सर्व आरोपींना २५ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्याच्या तपासासाठी उत्तर प्रदेश आणि हरियाणा एसटीएफची मोलाची मदत लाभली असून, या टोळीचे धागेदोरे कोठपर्यंत पसरले आहेत, याचा तपास पोलीस करत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या