मुंबई, (दादासाहेब येंधे) : शहरात बेकायदेशीररित्या राहणाऱ्या बांग्लादेशी नागरिकांची संख्या वाढत असताना आता त्यात अफगाणी नागरिकांची भर पडली आहे. गुन्हे शाखा १ आणि गुन्हे शाखा ५ च्या पथकाने संयुक्तरित्या कारवाई करून धारावी आणि कुलाबा परिसरात बेकायदेशीरिरत्या राहणाऱ्या अफगाणीस्तानच्या सहा नागरिकांना अटक केली आहे.
मुंबई गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त राज तिलक रोशन यांना मुंबईतील फोर्ट, कुलाबा आणि धारावी येथे राहणाऱ्या अफगाणी नागरिकांची माहिती मिळाली. त्यानंतर गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी परिसरात छापा टाकला. पोलिसांनी यावेळी त्यांनी अनेकांची चौकशी केली. यावेळी या सहा अफगाणी नागरिकांनी पोलिसांना आपण भारतीय असल्याचे सांगत दुसरीच नावे सांगितली. यावेळी मुंबई गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी त्यांना कागदपत्रे दाखवण्यास सांगितले. तेव्हा त्यांचा खोटेपणा पोलिसांसमोर उघड झाला. अटक केलेल्या आरोपींमध्ये अब्दुल समद हाजी अहमदजई नौरोजी हा मूळचा कंधारचा रहिवासी आहे. तसेच, अमिल उल्लाह हा मूळचा अफगाणिस्तानातील जाबुलचा रहिवासी आहे. तसेच इतर ४ अफगाणी नागरिक हे काबूलचे रहिवासी असल्याचे समोर आले आहे.
पोलिसांनी सांगितले की, हे सर्व अफग्णाई नागरिक २०१५ ते २०१९ दरम्यान वैद्यकीय व्हिसावर भारतात आले होते. ते सुरुवातीला दिल्लीत आले होते. त्यांनी असेही सांगितले की, त्यांचा व्हिसाची मुदत संपल्यानंतर ते फोर्ट, कुलाबा आणि धारावी भागात बेकायदेशीरपणे राहू लागले. आरोपींनी त्यांची नावे बदलली आणि बनावट ओळखपत्रे आणि निवासी प्रमाणपत्रे मिळवण्यासाठी बनावट ओळखपत्रे स्वीकारली आणि बेकायदेशीरपणे देशात राहण्यासाठी प्रयत्न केले. अधिकाऱ्याने सांगितले की, आरोपींना अफगाणिस्तानला प्रत्यार्पण केले जाणार आहे.


0 टिप्पण्या