Ticker

6/recent/ticker-posts

मुंबईत ड्रग्ज रॅकेटवर 'मोक्का'ची पहिली कारवाई

मुंबई, (दादासाहेब येंधे) : मुंबईच्या अँटी-नार्कोटिक्स सेलने एक मोठे ड्रग्ज रॅकेट उद्धवस्त केले असून, या प्रकरणात सुधारित ‘महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा’ अर्थात मोक्का (MCOCA) लागू करण्यात आला आहे. राज्यात ड्रग्ज तस्करी करणाऱ्या टोळ्यांवर मोक्का कायद्यांतर्गत केलेली ही पहिलीच कारवाई ठरली आहे. 

या प्रकरणात, बांद्रा युनिटने अदनान अमीर शेख याला ७६६ ग्रॅम एमडी या ड्रग्जसह अटक केली होती. चौकशीदरम्यान त्याने धक्कादायक खुलासा केला की, त्याची काकी कैनात जब्बार कुरेशी ही या रॅकेटची मुख्य सूत्रधार आहे. कैनात, तिचा पुतण्या अदनान आणि टोळीचा म्होरक्या जमीअर अहमद अन्सारी उर्फ जमीअर बोका यांच्या संगनमताने हे रॅकेट चालवले जात होते. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कैनात ही जमीअर बोकाकडून एमडी ड्रग्ज आणून बांद्रा आणि भायखळा परिसरात पुरवठा करत होती. विशेष म्हणजे, कैनातचा पती जब्बार कुरेशी याला याआधीच अमली पदार्थ कायद्याखाली (NDPS) अटक झाली आहे. पतीने तुरुंगात असतानाही कैनातने आपला पुतण्या अदनानला सोबत घेऊन हे रॅकेट सुरूच ठेवले होते. नुकत्याच, १० जुलै २०२५ रोजी महाराष्ट्र विधानसभेत मोक्का कायद्यात दुरुस्ती करण्यात आली होती आणि ३० जुलैपासून सुधारित तरतुदी लागू झाल्या आहेत. 


यामुळे आता ड्रग्ज तस्करीसारख्या संघटित गुन्ह्यांसाठीही मोक्का कायद्याचा वापर करणे शक्य झाले आहे. या दुरुस्तीमुळेच, पोलिसांनी या प्रकरणात संघटित गुन्हेगारीचे पुरावे सादर करत मोक्का लागू करण्याची परवानगी मिळवली. या तिघांविरुद्ध मोक्का कलम ३(१)(ii), ३(२) आणि ३(४) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या फरार असलेल्या कैनात आणि जमीअर यांचा पोलीस शोध घेत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या