तीन दिवस वेशांतर करून पोलीसांनी केली अटक
मुंबई, (दादासाहेब येंधे) : देशात बेकायदेशीरपणे राहण्याच्या आरोपाखाली २१ वर्षीय बांगलादेशी महिलेला नवी मुंबईहून अटक करण्यात आली होती. महिला अनेक आजारांनी ग्रस्त होती. अशातच तिला उपचारासाठी जे जे रुग्णालयात दाखल केलं होतं. पण ती रुग्णालयातून फरार झाली. याप्रकरणी एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, पाच महिन्यांची गर्भवती महिला रुबीना इरशाद शेखने गुरुवारी एका महिला कॉन्स्टेबलला धक्का देऊन ती रुग्णालयातून फरार झाली.

पोलिसांनी सांगितले की, ती एक बांगलादेशी नागरिक असून तिला ५ ऑगस्ट रोजी नवी मुंबईत बेकायदेशीरपणे वास्तव्य केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. तिची रवानगी भायखला येथील तुरुंगात करण्यात आली होती. ती आजारी असल्यामुळे तिला जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्याअनुषंगाने कैदी पार्टीतील पोलीस अंमलदारांच्या तक्रारीवरून सर जे जे मार्ग पोलीस ठाणे येथे गुन्हा रजि. क्र.३६८/२०२५ कलम २६२ भा.न्या.सं. अन्वये गुन्हा नोंद करण्यात येवून सदर आरोपी महिलेचा शोध सुरू करण्यात आला होता.
सदर गुन्हयाचा तपास करीत असताना सर जे जे मार्ग पोलीस ठाणे चे गुन्हे प्रकटीकरण अधिकारी पोलीस उप निरीक्षक प्रशांत नेरकर व पथकाने वेशांतर करून सलग ०३ दिवस सदर बांगलादेशी महिला आरोपीच्या राहण्याचा ठिकाणी तसेच तिच्या कामाच्या ठिकाणी पाळत ठेवून तिच्याबाबतीत माहिती काढली असता सदर महिला आरोपी ही वेगवेगळया ठिकाणी काम करीत असल्याचे समजले. प्रत्येक ठिकाणी गुप्त बातमीदारांमार्फत माहिती घेवून तांत्रिक माहितीच्या आधारे पोलीस रखवालीतून पळूल गेलेल्या सदर बांगलादेशी महिला आरोपीस दिनांक १८/०८/२०२५ रोजी नवघर अली रोड, तलवली, घनसोली, नवी मुंबई येथून सापळा रचून पोलीस पथकाने शिताफिने अटक केली आहे.
सदरची कामगिरी श्री. देवेन भारती, पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई, श्री. सत्य नारायण चौधरी, पोलीस सह आयुक्त (का व सु), बृहन्मुंबई, डॉ. अभिनव देशमुख, अपर पोलीस आयुक्त, दक्षिण प्रादेशिक विभाग, मुंबई, डॉ. प्रवीण मुंढे, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ -१, मुंबई, तनवीर शेख, सहायक पोलीस आयुक्त, डोंगरी विभाग, रईस शेख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सर जे जे मार्ग पोलीस ठाणे, मुकूंदा वाघमोडे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक प्रशांत नेरकर (गुन्हे प्रकटीकरण अधिकारी), पो. हवा. नियाजुददीन तडवी, पो. हवा. सचिन पाटील, पो शि मंदार घाडगे, पो शि प्रविण शेवरे, पो शि दिपक डावरे, पो शि ब्रम्हदेव कोलपूसे, म पो शि लहाने, म पो शि गोफने यांनी केली आहे.
0 टिप्पण्या