मुंबई, दि. २४ : एमबीए आणि एमएच सीईटीसह अन्य राज्यांतील महत्त्वाच्या प्रवेश परीक्षांसाठी नोंदणी केलेल्या उमेदवारांचा डेटा चोरून त्या उमेदवारांचे पर्सेंटाइल वाढवून देण्यासाठी १५ ते २० लाख रुपयांची मागणी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत मुंबई पोलिसांनी दिल्ली येथून चार उच्चशिक्षित भामट्यांना अटक केली आहे.

प्रवेश परीक्षा यंत्रणांकडून उमेदवारांचा तपशील फुटण्याचा धक्कादायक प्रकार या घटनेमुळे उघडकीस आला आहे. हे रॅकेट महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
मागील काही दिवसांपासून या रॅकेटमधील आरोपी दिल्ली येथून महाराष्ट्र, गुजरात, बिहार, राजस्थान तसेच अन्य राज्यांमधील वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांसाठी नोंदणी केलेल्या उमेदवारांचा डाटा चोरी करून त्यांच्याशी मोबाईलवरून संपर्क साधत असे. व्हाॅट्सॲपद्वारे ऑडिओ किंवा व्हिडीओ कॉल करून या उमेदवारांना नामांकित महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी पर्सेंटाइल वाढवून देण्याचे आश्वासन दिले जात असे. त्यासाठी १५ ते २० लाख रुपयांची मागणी केली जात होती अशी माहिती पोलीस तपासात समोर येत आहे.
पर्सेंटाइल वाढवून देण्यासाठी शासकीय प्रवेश परीक्षांची सिस्टिम हॅक केली जात असल्याचेही उमेदवारांना सांगितले जात असे. या प्रकारचे फोन कॉल येत असल्याच्या तक्रारी उमेदवारांकडून महाराष्ट्र राज्य सीईटी विभागाकडे करण्यात आल्या होत्या.
तपासात पोलिसांनी उमेदवारांना आलेल्या आरोपींच्या मोबाईल फोन कॉलचे तांत्रिक विश्लेषण करून त्याआधारे दिल्ली येथून चार आरोपींना अटक केली. या आरोपींकडून पाच ॲपलचे मोबाईल फोन, एक ॲपल मॅकबुक, एक ब्ल्यूटुथ हेडफोन आणि ६४ जीबीचा एक पेन ड्राइव्ह अशी सामग्री जप्त केली आहे. या आरोपींनी प्रवेश परीक्षा व्यवस्थेची यंत्रणा हॅक केली होती का, त्यांना तिथले काही कर्मचारी सामील होते का की ते फसवणूक करीत होते याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा