गावदेवी पोलिसांची उत्कृष्ट कामगिरी
मुंबई, (दादासाहेब येंधे) : गुंतवणुकीच्या नावाने अनेकांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घालणाऱ्या बारा जणांच्या एका टोळीला गावदेवी पोलिसांनी नुकतीच अटक केली. या टोळीने मुंबईसह विविध राज्यांत फसवणुकीचे गुन्हे केले असून त्यांनी उघडलेल्या ११० बँक खात्यांमध्ये आतापर्यंत ३० कोटी रुपये जमा झाल्याचे तपासात उघडकीस आले आहे. राजेंद्र भगीरथ सिंग ऊर्फ कुन हॅश, रोमन रेगीन्स ऊर्फ प्रविण दत्तू लोंढे, संदीप विष्णूकांत काकडे ऊर्फ पप्पू, आदित्य महेंद्र कुलकर्णी,अतुल राजेंद्र कोळी, फजलेरसुल अहमद, पियुष प्रकाश अग्रवाल, नामदेव विष्ण काळे ऊर्फ तात्या, शिवाजी साहेबराव साळुंके, गुरुविंदर बलविंदर सिंग, सागर ऊर्फ केशव शंतजय कुलकर्णी आणि दर्शन भगवान म्हात्रे अशी या १२ जणांची नावे असून या सर्वांना सोलापूर, नवी मुंबई, गोवा व पंजाब येथून अटक करण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

गावदेवी येथे एका ज्येष्ठ नागरिकाची गुंतवणुकीच्या नावाने फसवणूक झाली होती. भरघोस परताव्याचे आमिष दाखवून या ज्येष्ठ नागरिकाची फसवणूक करण्यात आली होती. याप्रकरणी फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल होताच गावदेवी पोलिसांच्या विशेष पथकाने सोलापूर येथील मोहोळ येथून नऊ, नवी मुंबईच्या खारघर, गोवा आणि पंजाब येथून प्रत्येकी एक अशा बाराजणांना अटक केली. तपासात ही टोळी कम्बोडिया या देशातील काही विदेशी सायबर गुन्हेगारांच्या संपर्कात होती. त्यांच्यासाठी ही टोळी काम करत होती. त्यांच्या सांगण्यावरुन त्यांनी विविध बँकांत खाती उघडून दिली होती. याच बँक खात्यात फसवणुकीची रक्कम जमा केली होती. त्यानंतर ती रक्कम एटीएमच्या माध्यमातून काढण्यात येत होती. क्रिप्टो करन्सीच्या माध्यमातून ही रक्कम कम्बोडिया येथे पाठवण्यात येत होती.
सदर उत्कृष्ट कामगिरी विवेक फणसळकर, पोलीस आयुक्त, देवेन भारती विशेष पोलीस आयुक्त, सत्यनारायण चौधरी (सहपोलीस आयुक्त कायदा व सुव्यवस्था), डॉ. अभिनव देशमुख, अप्पर पोलीस आयुक्त दक्षिण प्रादेशिक विभाग, डॉक्टर मोहित कुमार गर्ग, पोलीस उपयुक्त परिमंडळ-२, सुमन चव्हाण, स.पो. आयुक्त गावदेवी विभाग, विश्वनाथ कोळेकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, गावदेवी पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि. राजीव पाटील, मपोनि. सारिका कोडापे, स्पेशल सायबर सेल परिमंडळ-२ चे सपोनि विकास शिंदे, पोउनि. पंकज होले, विशाल पवार, सपोनि. गणेश जगदाळे, पोउनि. गोकुळ खैरनार, पोहवा. मुन्ना सिंग, पो.शि. राहुल थोरात, पोशि निलेश खुडे, संतोष कचरे, गाडेकर, गणेश जगदेव, अशोक पाटील, मपोशि. श्रध्दा कदम यांनी पार पाडली आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा