मुंबई, दादासाहेब येंधे : मुंबईच्या खार येथे एका वयस्कर महिलेची सेवा आणि घराची देखरेख करण्याकरिता कामावर ठेवलेल्या एका वीस वर्षीय तरुणीने आपल्या मित्राच्या मदतीने जवळजवळ एक हजार ग्रॅम सोन्याचे दागिने आणि दोन किलो चांदीचे दागिन्यांची चोरी केली आहे. याप्रकरणी खार पोलिसांनी दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून ६६५ ग्रॅम सोन्याचे आणि एक किलो चांदीचे दागिने पोलिसांनी जप्त केले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पांचाली संतोष ठाकुर, (वय ५७ रा.अहीसा मार्ग, १४, रोड, खार ) यांनी त्यांच्या घरात त्यांच्या आईची देखभाल करण्यासाठी महीमा नागेंद्र निशाद, (वय, २०) या तरुणीला कामावर ठेवले होते. परंतु, या तरुणीने घरात कोणीही नसल्याच्या संधीचा फायदा घेत मे २०२४ ते नोव्हेंबर २०२४ या कालावधी दरम्यान तिने घरातील कपाटाच्या लॉकरमध्ये ठेवलेले १००० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने २ किलो चांदिचे दागिने चोरी केली होती. अशी तक्रार खार पोलीस ठाणे येथे ८ नोव्हेंबर रोजी देण्यात आली असून पोलिसांनी आरोपीच्या विरोधात कलम ३०६ भा. न्या. सं. अन्वये गुन्हा नोंद केला होता.
गुन्हयाचा तपास व तांत्रिक विश्लेषनावरून सदर गुन्हा हा महीमा नागेंद्र निशाद हिने तीचा साथीदार रजनिश उर्फ विशाल शिवधन आर्या (वय,२२) याच्या सहकार्याने केला असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांना गुन्हयात अटक करण्यात आलेली आहे. अटक आरोपीकडून गुन्हयातील ६६५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व १ किलो चांदीचे दागिने असा एकूण ४७ लाख ५५ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. सदर उत्कृष्ट तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक, संजीव धुमाळ, खार पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक (गुन्हे), वैभव काटकर, गुन्हे प्रकटीकरण अधिकारी पोलीस उपनिरीक्षक कुंभारे व गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलीस अंमलदार भरत काच्चे, दिनेश शिर्के, योगेश तोरणे, महेश लहामगे, मनोज हांडगे, मयूर जाधव, महिला पोलीस अंमलदार पल्लवी बोराटे, अनिशा मोरे यांनी केला आहे.
0 टिप्पण्या