मुजोर रिक्षाचालकांना पोलिसांचा दणका
मुंबई, दि. ११ : मुंबईत वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ऑटो रिक्षा चालकांविरूध्द कारवाई करण्याकरीता मा. पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई, मा. विशेष पोलीस आयुक्त, मुंबई व मा. पोलीस सह आयुक्त (का.व.सु), मुंबई यांचे मार्गदर्शनाखाली विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आलेले आहे.

सदर विशेष मोहिम दि. २९/११/२०२४ रोजी पासुन राबविण्यात येत असून मोहिमेदरम्यान आजपर्यंत ऑटो रिक्षा चालक विना परवाना, ऑटो रिक्षा चालक विना गणवेश/बॅच, ऑटो रिक्षा चालक विना अनुज्ञप्ती, ऑटो रिक्षा विना वैध फिटनेस प्रमाणपत्र, ज्यादा प्रवासी वाहतूक करणारे ऑटो रिक्षा, पार्किंग स्टॅंड परिसराबाहेर ऑटो रिक्षा उभे करणे, ऑटो रिक्षा चालकाने अवैधीरित्या प्रवासी बोलाविणे, ऑटो रिक्षा चालकाने भाडे नाकारणाऱ्या एकुण २०९९ वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ऑटो रिक्षा चालकांविरूध्द कारवाई करण्यात आली असून एकुण ४२६ ऑटो रिक्षा जप्त करण्यात आलेल्या आहेत.
वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ऑटो रिक्षा चालकांविरूध्द कारवाई करण्याकरीता भविष्यात यापुढेही सदर विशेष मोहिम सातत्याने राबविण्यात येणार आहे. या विशेष मोहिमेच्या अनुषंगाने जनतेस याद्वारे आवाहन करण्यात येते की, वाहतूक नियमांचे उल्लंघन करणारे ऑटो रिक्षा चालक निदर्शनास आल्यास त्यांचे विरूध्द कारवाई करण्याकरीता बृहन्मुंबई पोलीस दलाच्या मुख्य नियंत्रण कक्ष, मुंबई येथील १००/१०३/११२ या संपर्क क्रमांकावर संपर्क साधण्यात यावा.
0 टिप्पण्या