कांदिवलीच्या व्यावसायिकाची फसवणूक
मुंबई, दादासाहेब येंधे : सायबर हेल्पलाइनमुळे चार तासांत साडे चार कोटी वाचविण्यात पोलिसांना यश आले आहे. कांदिवलीतील खाजगी कंपनीच्या एका मालकाने सिम स्वॅप सायबर फसवणुकीत हे पैसे गमावले होते. सायबर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २३ डिसेंबरला सायबर गुन्हेगारांनी कांदिवलीतील एका खाजगी कंपनीच्या मालकाचे सिम स्वॅप करून त्यांच्या कंपनीच्या नावावर असलेल्या बँक खात्यामध्ये अनधिकृतरीत्या प्रवेश मिळवला. सायबर ठगांनी या खात्यातून व्यवहार करीत सात कोटी ५० लाख रुपये विविध बँक खात्यांवर वळते केले होते. कंपनी मालकाला ई-मेलवर याची माहिती दिसताच त्यांची फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यांनी ताबडतोब १९३० या सायबर हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क करून तक्रार दाखल केली.

त्यानुसार, १९३० सायबर हेल्पलाइन कक्षाचे पोलिस उपनिरीक्षक मंगेश भोर, पोलिस हवालदार राऊळ, महिला पोलिस हवालदार वालावलकर, पोलिस शिपाई किरण पाटील यांनी तत्काळ संबंधित बँकेच्या नोडल अधिकाऱ्यांना व्यवहार थांबविण्यास सांगितले. त्यामुळे साडे सात कोटीपैकी ४ कोटी ६५ लाख वाचविण्यात पोलिसांना यश आले.
पोलिसांचे नागरिकांना आवाहन - अशाप्रकारे टाळा आर्थिक फसवणूक
आर्थिक फसवणूक टाळण्यासाठी बँक खाते एसएमएसशिवाय ई-मेल अलर्ट कार्यान्वित करावे. सिम कार्ड बंद झाल्यास संबंधित बँकेला त्याचा खात्याशी असलेला संबंध तोडण्यास कळवावे.
विशेषतः सार्वजनिक सुटीच्या दिवशी किंवा सलग सुट्यांच्यावेळी या घटना घडतात. त्यामुळे मोबाईल गॅलरी आणि बँकांमध्ये प्रत्यक्ष जाऊन संपर्क करण्यात अडथळा येतो.
अशा वेळी कस्टमर केअरशी संपर्क साधून वेगाने पावले उचलण्याची गरज आहे. टू-फॅक्टर ऑथिटिकेशन (दुहेरी पडताळणी) कार्यान्वित करा. हे आपल्या सोशल मीडिया खात्यांमध्ये अनोळखी व्यक्तींना अनधिकृत प्रवेश रोखण्यास मदत करू शकते.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा