मुंबई, दादासाहेब येंधे : मुंबई पोलिसांच्या नॉर्थ सायबर सेलने एका मोठ्या सायबर फसवणुकीचा पर्दाफाश केला असून, कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्यात सहभागी असलेल्या तीन जणांना अटक केली आहे. शेअर बाजारातील गुंतवणुकीवर आकर्षक परतावा देण्याचे आश्वासन देऊन त्यांनी एका महिलेची २.८५ कोटी रुपयांची फसवणूक केली होती. त्यानंतरच्या तपासामध्ये आरोपींचे मोठे जाळे समोर आले.
शेषनाथ उर्फ गणेश शत्रुघ्न पांडे, सतीश पुनमिया आणि राहुल बच्चन अशी आरोपींची नावे आहेत. आता या प्रकरणी तिघांनाही कोठडी सुनावण्यात आली आहे.
माहितीनुसार, या तिघांना दीव-दमण, गुजरात आणि मुंबई येथून पकडण्यात आले. मुंबई, ठाणे, मीरा-भाईंदर आणि वसई-विरारसह देशभरात आरोपींच्या नावावर १३० गुन्हे दाखल आहेत. तसेच त्यांची किमान ७० बँक खाती आहेत. अधिकाऱ्याने सांगितले की, वृद्ध महिलेला शेअर बाजारात गुंतवणूक करण्याबाबत व्हॉट्सॲपवर मेसेज आला होता.
त्यांनी तिला त्यांच्या वेबसाइटच्या मुख्यपृष्ठावर एक लिंक पाठवली, जिथे तिला ट्रेंड आणि बाजाराची माहिती मिळायची. अशा प्रकारे तिची २.८५ कोटी रुपयांची फसवणूक केली. या वर्षी २ फेब्रुवारी ते ७ मार्च दरम्यान झालेल्या या घोटाळ्यात आरोपी कायदेशीर स्टॉक ब्रोकर असल्याचे भासवत होते. त्यांनी महिलेला शेअर बाजारातील फायदेशीर गुंतवणुकीच्या संधी ऑफर केल्या होत्या.
फसवणूक करणाऱ्यांनी पीडितेचा विश्वास संपादन करण्यासाठी बनावट सेबी (सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया) नोंदणी प्रमाणपत्रासह बनावट कागदपत्रे देखील दिली. या खोट्या दाव्यांवरून त्यांनी महिलेचा विश्वास संपादन केला व तिला योजनेत २.८५ कोटी रुपये गुंतवण्यास प्रवृत्त केले. मात्र, पीडितेने पैसे ट्रान्सफर केल्यानंतर त्यांनी फोन बंद केला. त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे महिलेच्या लक्षात आले असता तिने पोलिसांशी संपर्क साधला. तक्रार प्राप्त होताच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुवर्णा शिंदे यांच्या नेतृत्वाखाली तपास सुरू केला. फसवणूक केलेले पैसे अनेक बँक खात्यांमध्ये जमा केल्याचे तपासात समोर आले आहे. गोपनीय स्त्रोतांकडून मदतीच्या आधारे पोलिसांनी दमण आणि दीव, गुजरात आणि मुंबई येथून तीन आरोपींचा शोध घेतला आणि त्यांना अटक केली.
0 टिप्पण्या